प्रसिद्ध दिग्दर्शन नितेश तिवारी यांचा चित्रपट
दंगल, छिछोरे, चिल्लर पार्टी यासारखे अनेक चित्रपट निर्माण केलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी स्वतःच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘बस करो आंटी’ आहे. हा चित्रपट वरुण अग्रवाल यांचे पुस्तक ‘हाउ आय ब्रेव्हड अनु आंटी अँड को-फाउंडेड ए मिलायन डॉलर कंपनी’वर आधारित आहे. चित्रपटात इश्वाक सिंह आणि महिमा मकवाना मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची पटकथा नितेश तिवारी यांनीच लिहिली आहे. या चित्रपटाच्या प्रकल्पात नितेश यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अश्विनी अय्यर तिवारी यांचाही सहभाग आहे. तर अभिषेक सिन्हा याचे दिग्दर्शन करणार आहेत.

बस करो आंटी हा चित्रपट तरुणाईला आकर्षित करण्याची क्षमता बाळगून आहे. नव्या पिढीचे लोक स्वतःच्या कारकीर्दीला दिशा देण्याचा आणि स्वतःच्या कौशल्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा तरुण-तरुणींना संदेश देणारा हा चित्रपट असल्याचे निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांनी म्हटले आहे.
या चित्रपटाची निर्मिती स्टार स्टुडियोज, आरएसव्हीपी, रॉय कपूर फिल्म्स आणि अर्थस्की पिक्चर्सकडून केली जाणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण मुंबईत होणार आहे. महिमाला या चित्रपटाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. यापूर्वी ती सलमान खानच्या अंतिम चित्रपटात दिसून आली होती.