सिंगापूर येथे होणार अंतिम फेरी
प्रतिनिधी /फोंडा
सिमेपाईण-म्हार्दोळ येथील युवा छायाचित्रकार मांगीरीश सर्वेश पालकर याची जागतिक छायाचित्र चषकासाठी निवड झाली आहे. जगभरातील काही नामांकित छायाचित्रकार संघटनांतर्फे ऑलंपिक स्पर्धेशी समांतर अशी ‘वल्ड फोटोग्राफी कप’ ही फोटोग्राफी स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाती. सिंगापूर येथे येत्या 17 मार्च रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी होणार असून त्यात सर्वोत्कृष्ट छायाचित्रे निवडली जाणार आहेत.
मांगिरीश याचे छायाचित्र ‘वेडिंग’ म्हणजे लग्न समारंभ या विभागात निवडले गेले आहे. सिंगापूर येथे होणाऱया अंतिम फेरीसाठी त्याला निमंत्रण पाठविण्यात आले असून भारतीय संघाचे कर्णधार रोहन गोएश यांनी तसे पत्र मांगीरीशला पाठविले आहे. या स्पर्धेत जगभरातील चाळीस राष्ट्रांचे छायाचित्रकार सहभागी होणार आहेत. प्रत्येक राष्ट्राचा संघ आपापल्या देशाचे प्रतिनिधित्त्व करणार आहे. व्यावसायिक, चित्रण, पर्यावरण, पोट्रेट, घटना व लग्न समारंभ अशा विविध सहा विभागातून ही स्पर्धा आयोजित केली जाते व त्यातून सर्वोत्कृष्ट छायाचित्रे अंतिम फेरीसाठी निवडली जातात. अंतिम फेरीतील तीन सर्वोकृष्ट छायाचित्रांना सुवर्ण, रौप्य व कास्य पदके बहाल केली जातात. याशिवाय सर्वोत्कृष्ट संघही निवडला जातो. मांगिरीश हा भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहे. सन 2021 मध्ये झालेल्या या स्पर्धेत जगभरातील 38 देश सहभागी झाले होते. मांगीरीश हा फर्मागुडी येथील पीईएस श्री रवी नाईक महाविद्यालयाचा विद्यार्थी असून विज्ञान शाखेच्या तिसऱया वर्षांत तो शिकत आहे. म्हार्दोळ येथील निकीता फोटो स्टुडिओचे मालक सर्वेश पालकर यांचा तो सुपुत्र आहे. हल्लीच छायापत्रकार संघटनेतर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेत त्याला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले होते.
फोटोग्राफी स्पर्धेत त्याने आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पारितोषिके पटकावली आहेत. प्लॅनेट गोवा या नियतकालीकामध्ये फोटो प्रसिद्ध होण्याचा मान त्याला अत्यंत कमी वयात लाभला आहे. मध्यप्रदेश येथील मंदासूर विद्यापीठाच्या फोटोग्राफी स्पर्धेत अखिल भारतीय स्तरावर उत्कृष्ट फोटोग्राफीचा मानही त्याला लाभला आहे.