काहीच मिळाले नसल्याचा सिसोदियांचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील अबकारी धोरण घोटाळय़ाप्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआयने मंगळवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या बँक लॉकरची झडती घेतली आहे. गाजियाबादमधील पंजाब नॅशनल बँकेत सिसोदिया यांचा बँक लॉकर आहे. सीबीआयच्या पथकाने बँकेत जात या लॉकरची तपासणी केली आहे. यादरम्यान सिसोदिया आणि त्यांची पत्नी देखील बँकेत उपस्थित होती. चौकशीदरम्यान बँकेत कुणालाच प्रवेश देण्यात आला नव्हता.
लॉकरमधून सीबीआयला काहीच मिळाले नसल्याचा दावा सिसोदिया यांनी केला आहे. पंतप्रधानांनीच माझ्या लॉकरची तपासणी करविली आहे. 2-3 महिन्यांपासून मला तुरुंगात पाठविण्याचा कट रचला जात असल्याचे सिसोदिया यांनी म्हटले आहे. लॉकर संबंधित खातेधारकाची अनुमती आणि उपस्थितीशिवाय खोलात येत नाही. याचमुळे सिसोदिया आणि त्यांच्या पत्नीला बोलाविण्यात आले होते.