ऑनलाईन टीम / मुंबई :
येत्या काही तासात मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, केरळसह दक्षिण भारतातील काही राज्यांना पावसाने झोडपून काढलं असतानाच हवामान विभागाने महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. (mansoon yellow alert 9 districts from maharashtra)
सध्या अनेक राज्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, केरळसह मेघालय, आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज केरळातील पाच जिल्ह्यांमध्येही 40-50 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. एर्नाकुलम, इडुक्की, त्रिचूर, कोझिकोडे, आणि कन्नूर या जिल्ह्यांना रेड ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासन अलर्ट असून, नागरिकांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.