मराठी भाषा टिकविण्याबरोबरच अन्य भाषांचा आदर करणे आपले कर्तव्य
प्रतिनिधी /बेळगाव
मराठी साहित्यातील ज्येष्ट कवी अशोक नायगावकर आणि कवी व लेखक महेश केळुसकर यांचा ‘मस्करीका’ हा कार्यक्रम रविवार दि. 27 रोजी सकाळी 11 वाजता लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळ गल्ली येथे होणार आहे. आपली भाषा टिकविणे ही आपली जबाबदारी आहे. त्याचवेळी अन्य भाषांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे.
एकच दिवस भाषेचे गौरवगीत गाऊन चालणार नाही तर भाषा विकसित होण्यासाठी तिचा व्यवहारातील वापर वाढायला हवा. याच हेतूने स्वामीराज प्रकाशनतर्फे ‘मराठी आठव दिवस’ उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम होत आहे. यावेळी उपरोक्त दोन्ही कवी आपल्या दिलखुलास शैलीने साहित्य प्रांताची सफर घडविणार आहेत. हास्य विनोदाने सजलेला हा कार्यक्रम बेळगावकरांना निश्चितच हसविणार आहे. या दोघांचा परिचय पुढील प्रमाणे..
ग्रंथालीतर्फे दुसरा कवितासंग्रह 29 डिसेंबरला प्रकाशित- अशोक नायगावकर
गेली 50 वर्षे नायगावकर मराठी कविता लिहीत व वाचत आहेत. 1992 साली त्यांचा ‘वाटेवरच्या कविता’ हा कवितांसह ग्रंथालीतर्फे प्रकाशित झाला. आणि आता तब्बल 30 वर्षांनंतर ग्रंथालीकडूनच दुसरा कवितासंग्रह 29 डिसेंबरला प्रकाशित येईल. त्यांनी 10 वर्षे जे सदर लेखन केले, त्यातील निवडक लेख डॉ. महेश केळुसकर आणि श्रीकांत बोजेवार यांनी संकलत केले आणि ‘नायगावकरी’ या नावाने ‘अमघा प्रकाशन’तर्फे हे पुस्तक प्रसिद्ध झालयं. झीटीव्ही वरील ‘हास्यसम्राट’ मालिकेचे परीक्षक म्हणून ते घरा-घरात पोहोचले. ‘कवितांच्या गावा जावे’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या काना-कोपऱयात आणि देशाच्या विविध शहरात कविता वाचत अनेक वर्षे हिंडले.
31 पुस्तके प्रकाशित -डॉ. महेश केळुसकर
महेश केळुसकर याचं नाव घेतले की, सगळय़ांच्या ‘झिनझिनाट’ होतो. बहुमुखी प्रतिभा लाभलेल्या डॉ. केळुसकर यांची गेल्या 40 वर्षात आतापर्यंत 31 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कविता, कथा, कादंबरी, ललित गद्य, नाटक, चित्रपट व संशोधनात्मक लेखनाची ही मुशाफिरी केळुसकरांनी 63 व्या वषीही सुरू ठेवली आहे. त्यांच्या साहित्याला राज्य पुरस्कारांसहित अनेक मानसन्मान लाभलेत. आकाशवाणीत विविध अधिकार पदांवर त्यांनी साडे छत्तीस वर्षे काम केले. सृजनशील निर्मिती केली. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले. अनेक नव्या लेखक-कवींना ‘आवाज दिला’ स्वामीराज प्रकाशनतर्फे ‘झेंडूचे झुले हा विडंबन गीतसंग्रह व शलाका प्रकाशनतर्फे हसरगुंडी हा हास्य-व्यंग लेखसंग्रहही डॉ. केळुसकरांची दोन पुस्तके अलीकडेच मुंबईत प्रकाशित केली आहेत.