आगामी 12 ते 14 महिन्यात पूर्ण होणार प्रक्रिया
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
टाटा कॉफी लिमिटेड यांचे टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड यांच्यासोबत (टीसीपीएल) विलीनीकरण होणार असल्याचे संकेत आहेत. साधारणपणे दोन्ही कंपन्यांमधील हा व्यवहार आगामी 12 ते 14 महिन्यांमध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.
टाटा कॉफी लिमिटेडचे कार्यकारी संचालक व मुख्य अर्थिक अधिकारी के वेंकटरमन यांनी यावेळी एका बैठकीमध्ये म्हटले आहे, की ही भागीदारी पूर्ण करण्यासाठी कंपनीला 12 ते 14 इतक्या महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मात्र हाच कालावधी निश्चित मानता येणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या विलीनीकरणासाठी एक योजना आखली असल्याची माहिती आहे. यानंतरच दोन्ही कंपन्यांमध्ये भागीदारी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
10 पैकी टीसीपीएलचे 3 समभाग मिळणार
सदरच्या भागीदारीच्या योजनेतून टाटा कॉफीच्या समभागांना त्याच्या जवळील प्रत्येकी 10 इक्विटी समभागात टीसीपीएलचे तीन इक्विटी समभाग मिळणार आहेत.
टाटा कॉफीचे समभाग मागील आठवडय़ात शुक्रवारी 0.57 टक्के म्हणजे 1.25 रुपयांनी वधारुन 221.30 वर बंद झाले तर हेच समभाग 52 आठवडय़ात उच्चांकी 254 रुपयांवर पोहोचले तर 126 रुपयांवर नीचांकीही राहिले आहेत.