इंडोनेशियाच्या बाली येथील अनोखा प्रकार

अनेकदा काही अनोखे करण्याच्या नादात हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक ग्राहकांच्या सुरक्षेबद्दल विचार करत नाहीत. याचेच उदाहरण आहे बालीच्या साउथ कुटा येथील द केव्ह नावाचे रेस्टॉरंट. हे रेस्टॉरंट एका जुन्या गुहेत तयार करण्यात आले असून तेथे गेल्यावर लोकांना भूतकाळात जाण्याची संधी मिळते.
सर्वसाधारणपणे रेस्टॉरंट किंवा हॉटेल एखाद्या थीमवर तयार केले जाते, तेव्हा त्या ठिकाणाला तसा लुक दिला जातो. परंतु बालीच्या साउथ कुटा येथील द केव्ह रेस्टॉरंटची थीम गुहा नसून ते लाखो वर्षे जुन्या गुहेतच तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी होत असलेल्या उत्खननादरम्यान ही गुहा आढळून आली होती.
अलिकडेच या रेस्टॉरंटमध्ये एक टिकटॉकर शेलफाय बाँग पोहोचली होती, तिने रेस्टॉरंटचे रिह्यू केले होते. या पूर्ण रेस्टॉरंटच्या खाद्यपदार्थांसह इंटीरियरबद्दल तिने यात माहिती दिली होती, ज्यानंतर या ठिकाणच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले. हे रेस्टॉरंट द एज हॉटेलचाच हिस्सा असून लोक येथे वास्तव्यादरम्यान खाण्यापिण्यासाठी द केव्हमध्ये जातात. शेलफायने स्वतःच्या रिह्यूमध्ये हे रेस्टॉरंट दिवसा जाण्यास योग्य असून तेव्हा प्रत्येक गोष्ट फिरून पाहता येत असल्याचे म्हटले आहे.
पर्यावरणीय व्यवस्थेत बळजबरीने घुसून रेस्टॉरंट स्थापन केल्याबद्दल अनेक जण नाराजी व्यक्त करत आहेत. लोकांच्या विरोधानंतर कुटाच्या जिल्हाप्रमुखांनी या ठिकाणाच्या चौकशीचे आदेश दिले. यात हे रेस्टॉरंट चालविण्यासाठी परवाना घेण्यात आला नव्हता असे आढळून आल्याने ते तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे. लोकांना हे रेस्टॉरंट अत्यंत असुरक्षित वाटले, गुहा अत्यंत जुनी असल्याने त्यात दरड कोसळण्याची भीती आहे. गुहेतील मिनरल स्ट्रक्चरही मानवी वावरामुळे तुटून पडू शकते. लोकांना आकर्षित करणे आणि काही वेगळे इन्फ्रास्ट्रक्चर दाखविण्यासाठी एका ऐतिहासिक गुहेला सार्वजनिक ठिकाणात बदलणे लोकांना आवडलेले नाही.