सिंधू, प्रणॉय, सायना दुसऱया फेरीत, श्रीकांत,कश्यप, बनसोड पराभूत
वृत्तसंस्था/ सिंगापूर
सिंगापूर ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत मिथुन मंजुनाथने पहिल्याच फेरीत आपल्याच देशाच्या किदाम्बी श्रीकांतला पराभवाचा धक्का देत दुसरी फेरी गाठली तर अश्मिता चलिहानेही धक्कादायक निकाल नोंदवताना थायलंडच्या 12 व्या मानांकित ओ. बुसाननचा पराभव केला. पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय, सायना नेहवाल यांनीही विजयी सलामी दिली तर श्रीकांतप्रमाणे पारुपल्ली कश्यपलाही पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला.
24 वर्षीय मिथुन मंजुनाथने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य मिळविलेल्या के. श्रीकांतवर 21-17, 15-21, 21-18 अशी मात केली. प्रकाश पदुकोन अकादमीत तयार झालेला मिथुन हा जागतिक क्रमवारीत 77 व्या स्थानावर असून त्याची पुढील लढत आयर्लंडच्या एन्हात एन्ग्युएनशी होईल. यावर्षी एप्रिलमध्ये झालेल्या अर्लीन्स मास्टर्स सुपर 100 स्पर्धेत मंजुनाथने अंतिम फेरी गाठत उपविजेतेपद पटकावले होते. त्याने श्रीकांतवर वर्चस्व राखत पहिला गेम जिंकला. मात्र दुसऱया गेममध्ये श्रीकांतने मुसंडी मारत बरोबरी साधल्यानंतर तिसऱया गेममध्ये दोघांमध्ये बरीच चुरस झाली. श्रीकांतने एकदा 16-15 अशी आघाडीही घेतली होती. पण शेवटी मंजुनाथने 18-18 वरून सलग तीन गेम घेत बाजी मारून श्रीकांतचे आव्हान संपुष्टात आणले. मंजुनाथने अ.भा. मानांकन चार स्पर्धा जिंकल्या असून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेचाही त्यात समावेश आहे.

सिंधू, अश्मिता विजयी
दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकलेली पीव्ही सिंधू व एचएस प्रणॉय यांनी सहज विजय मिळवित दुसरी फेरी गाठली. सिंधूने पूर्णपणे वर्चस्व राखत बेल्जियमच्या लियान टॅनला 21-15, 21-11 असे हरविले. तिची पुढील लढत व्हिएतनामच्या थुय लिन्ह एन्ग्युयेनविरुद्ध होईल. महिला एकेरीत अश्मिताने थायलंडच्या ओ. बुसाननचा 21-16, 21-11 असा पराभव केला. अश्मिताला चीनच्या हान युइशी सामना करावा लागेल.
गेल्या आठवडय़ात मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या प्रणॉयने थायलंडच्या सिथिकोम थम्मासिनवर 21-13, 21-16 असा सहज विजय मिळविला. त्याची पुढील लढत तिसऱया मानांकित चौ तिएन चेनशी होईल. मागील आठवडय़ात मलेशिया ओपन स्पर्धेत प्रणॉयने त्याला हरविले होते. पी. कश्यपचे आव्हान मात्र पहिल्याच फेरीत समाप्त झाले. त्याला इंडोनेशियाच्या जोनातन ख्रिस्तीने 21-14, 21-15 असे हरविले.
सायना दुसऱया फेरीत
लंडन ऑलिम्पिक कांस्यविजेत्या सायना नेहवालने आपल्याच देशाच्या मालविका बनसोडचा 21-18, 21-14 असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली. यावर्षीच्या इंडिया ओपन स्पर्धेत मालविकाने सायनाला हरविले होते, त्या पराभवाची परतफेड सायनाने येथे केली. महिला दुहेरीत पूजा दंडू व आरती सारा सुनील यांनी दुसरी फेरी गाठली असून तैपेईच्या हु लिंग फँग व लिन झियाव मिन यांनी माघार घेतल्याने त्यांना पुढे चाल मिळाली.