ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात बुधवारी गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व गटप्रमुख, कार्यकर्त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं आवाहन करत मुख्यमंत्री शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, मेळाव्यासाठी स्टेजवर नेत्यांच्या नावाच्या खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये शिवसेना नेते संजय राऊत (sanjy raut) यांच्या नावाची खुर्ची होती. खुर्चीवर संजय राऊत यांचं नाव लिहिलेलं होतं. राऊत सध्या पत्रा चाळ संबंधित आरोपांप्रकरणी आर्थर रोड कारागृहात आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची खुर्ची रिकामी होती. त्यांच्या रिकाम्या खुर्चीवरुन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला. तर दुसरीकडे मनसेकडून त्याच खुर्चीच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (sandip deshpande) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती. उद्या तुमची पण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल, तयारी ठेवा”, असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काल गटप्रमुखांच्या मेळाव्यात भाषणाला सुरुवात करताच उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचे सांगत इरादा स्पष्ट केला. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, व्यासपीठावर आल्यानंतर दोन गोष्टी पाहिल्या. एक रिकामी खूर्ची आहे, मी एक खुलासा करू इच्छितो नाही तर उद्या एक चौकट यायची संजय राऊत मिंधे गटात गेले. मिंधे सगळे तिकडे गेले आहेत, पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढतोय. आणि लढाईसाटी सोबत आहे, तलवार हाती घेऊन आघाडीवर आहे, असे ते म्हणाले होते. यावर मनसेचे संदीप देशपांडे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.”आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती. उद्या तुमची पण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल, तयारी ठेवा”, असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.