ऑनलाईन टीम / तरुण भारत :
गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीसह अन्य छोटय़ा-मोठय़ा पक्षांनी कंबर कसली असून, त्यांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. एमआयएम देखील 30 जागांवर ही निवडणूक लढवणार आहे. मात्र, एमआयएमला गुजरातमध्ये काही ठिकाणी विरोध होत आहे. एमआयएमच्या सुरतमधील एका प्रचारसभेत मोदी-मोदी अशा घोषणा देत श्रोत्यांनी खासदार असदुद्दीन ओवैसी यांना काळे झेंडे दाखविले.
गुजरातमधील सुरत येथई रुद्रपुरा भागात एका सभेला संबोधित करण्यासाठी ओवैसी आले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतावेळी सभेला उपस्थित असलेल्या श्रोत्यांनी मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या. तसेच त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
गुजरात विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. त्यासाठी 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. 182 पैकी 89 मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तर 93 मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.