मातोश्रींवर अहमदाबादमधील रुग्णालयात उपचार
अहमदाबाद / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांची प्रकृती खालावली आहे. याचदरम्यान बुधवारी दुपारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदीही आईला पाहण्यासाठी अहमदाबादमधील रुग्णालयात पोहोचले होते. त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि काही राज्यमंत्री हॉस्पिटलमध्ये आहेत. अहमदाबादमधील मेहता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून येथील सुरक्षा व्यवस्थाही कडक ठेवण्यात आली होती. जवळपास सव्वा ते दीड तास रुग्णालयात आईच्या प्रकृतीची पाहणी आणि विचारपूस केल्यानंतर पंतप्रधान सायंकाळी दिल्लीला परतले. या धावत्या दौऱयात त्यांनी मातोश्रींवर उपचार करणाऱया डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली.
पंतप्रधानांच्या मातोश्री हिराबेन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने मंगळवारी रात्री उशिरा अहमदाबाद येथील यु. एन. मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेऊन आहे. हिराबेन यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे रुग्णालयाने बुधवारी दुपारी हेल्थ बुलेटिन जारी करत स्पष्ट केले आहे. यापूर्वी 2016 मध्येही हिराबेन यांची प्रकृती खालावली होती. हिराबेन यांनी जूनमध्येच 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या वाढदिनी पंतप्रधान मोदीही त्यांना भेटायला आले होते.
राहुल-प्रियांकाचे ट्विट
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिराबेन यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “आई आणि मुलाचे प्रेम शाश्वत आणि अनमोल असते. मोदीजी, या कठीण काळात आम्ही तुमच्यासोबत आहे. आपली आई लवकर बरी होईल अशी आशा मला वाटते’’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही ट्विट करत पंतप्रधान मोदींच्या आईला लवकर आराम मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.