ऑनलाईन टीम / बर्लिन :
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (pm narendra modi) युरोप दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. पीएम मोदी आज डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनला (Copenhagen) भेट देणार आहेत. तिथे मोदी डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेड्रिक्सन (Mete Frederickson) यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील आणि सामंजस्य करारांची देवाणघेवाण करतील. त्यानंतर मोदी बिझनेस गोलमेजमध्ये सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी रात्रीचे जेवण राणी मार्गरेट द्वितीय यांच्यासोबत करतील.
पंतप्रधान मोदी सोमवारी जर्मनीत पोहचले. युरोप दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मोदींनी जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांची भेट घेतली. भारत आणि जर्मनी यांच्यात काही करार झाले आहेत. भारताचे कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि जर्मनीचे आर्थिक सहकार व विकास मंत्री वेन्झा शुल्झ यांनी कृषी क्षेत्रासंदर्भात एका महत्त्वाच्या करारावर व्हर्च्युअल बैठकीत स्वाक्षऱ्या केल्या. या करारात कृषी क्षेत्रातील नैसर्गिक संसाधनांच्या चांगल्या व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. याअंतर्गत दोन्ही देश या क्षेत्रातील सामायिक संशोधनाला प्रोत्साहन देतील आणि माहितीची देवाणघेवाण करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.