ऑनलाईन टिम : रायपूर
छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात एका पोलिस छावणीवर माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. गंभीर जखमींपैकी दोघांना सोमवारी एअरलिफ्ट करून रायपूरला हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास छत्तीसगड सशस्त्र दलाच्या (सीएएफ) जिगुर पोलिस कॅम्पवर माओवाद्यांनी गोळीबार केला. जखमींपैकी तीन राज्य पोलिसांचे आणि दुसरे CAF जवान आहेत.
“सुमारे 30 मिनिटे हा गोळीबार सुरू होता…माओवाद्यांनी हल्ल्यत बॅरल ग्रेनेड लाँचरचाही वापर केला” असे बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरज पी. म्हणाले. पोलिसांनी प्रत्युत्तर दिल्यावर हल्लेखोर जंगलात पळून गेले.
पोलीस छावणीवर अशाप्रकारचा महिनाभरातील दुसरा हल्ला असून यापुर्वी 20 मार्च रोजी माओवाद्यांनी सुकमा जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कॅम्पवर हल्ला करून तीन जवान जखमी केले होते.