पुणे / वार्ताहर :
स्वारगेट परिसरात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड सचिन माने व त्याच्या 13 साथीदारांवर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 199 चे कलम 3 (1), 3 (2), 3 (4) नुसार (मोक्का) कारवाई केली आहे.
टोळी प्रमुख सचिन परशुराम माने (वय 24, रा. गुलटेकडी, पुणे), निखील राकेश पेटकर (22, रा. बिबवेवाडी, पुणे), रोहित मधुकर जाधव (27), अजय प्रमोद डिखळे (24), यश किसन माने (18), अमर तानाजी जाधव (23), विजय प्रमोद डिखळे (18), मोन्या ऊर्फ सुरज सतिश काकडे (26, सर्व रा. गुलटेकडी, पुणे) व एक विधीसंघर्षित बालक आणि इतर चार साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवर आजूबाजूच्या भागात दरोडा, जबरी चोरी, खंडणी, हफ्ता गोळा करणे, अवैध मार्गाने आर्थिक प्राप्तीसाठी आपले गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित करण्याच्या हेतूने खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे, दरोडा, जबरी चोरी, मारामारी, मुलींची छेडाछाड काढणे अशाप्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपींना या गुन्ह्याअंतर्गत 2021 मध्ये एक वर्षाकरिता स्थानबध्द करण्यात आले होते. परंतु त्यातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा आपले साथीदार एकत्र करुन खुनाचा प्रयत्न व परिसरात दहशत निर्माण करुन हप्ते वसुली सुरू केली होती. अधिक तपास गुन्हे शाखा एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पवार करत आहेत.
अधिक वाचा : शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी