कोल्हापूर प्रतिनिधी
बनावट ठेव तारण कर्ज, रोख शिल्लक वाढवून दाखविणे, बोगस गुंतवणूक, बोगस डिव्हीडंट वाटप केल्याचे दाखवून सोन्या मारुती नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कोल्हापूर या पतसंस्थेमध्ये १ कोटी ३१ लाख ६७ हजार १५४ रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१९ या पाच वर्षाच्या लेखा परिक्षणात ही माहिती समोर आली असून, या प्रकरणी चेअरमन, व्यवस्थापिका, रोखापाल, यांच्यासह अन्य ३ लेखा परीक्षकांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची विशेष लेखा परिक्षक फिर्याद अनिल सच्चिदानंद पैलवान (वय ५३ रा. विश्रामबाग, सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संस्थेचे चेअरमन सुनिल आनंदराव पाटील (रा. सी वॉर्ड, शनिवार पेठ), व्यवस्थापिका अनिता अनिल पोवार (रा. हडको कॉलनी, साळोखे नगर), रोखपाल राजेंद्र खंडेराव पाटील (रा. ए वॉर्ड, फुलेवाडी), प्रमाणीत लेखा परिक्षक एम. एस. पाटील, श्रीकांत मा. घोरपडे, एम. एस. कळसकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील शनिवार पेठ परिसरात सोन्या मारुती नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यालय आहे. या पतसंस्थेमधून ठेवीदार, गुंतवणूकदारांना पैसे वेळच्या वेळी मिळत नसल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे ठेवीदारांनी २०२० मध्ये दाखल केली. यानुसार फेरलेखापरिक्षणासाठी लेखा परिक्षक वर्ग २ अनिल पैलवान यांची नेमणूक उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने करण्यात आली. त्यांनी १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीचे फेरलेखा परिक्षण केले. यामध्ये संस्थेचे चेअरमन सुनिल पाटील, व्यवस्थापिका अनिता पोवार, रोखापाल राजेंद्र पाटील यांनी संस्थेच्या रकमेत अपहार केल्याचे समोर आले. अपहार करताना त्यांनी संस्थेतील रोख शिल्लक रक्कम चुकीची दाखवली, बचत खात्याची रक्कम बोगस खर्च दाखविली, तसेच संस्थेच्या इमारतीचे मुल्यांकन वाढवून ठेवीदारांना खोटे व्याज दिल्याचे भासवले, सभासदांना लाभांश दिल्याच्या खोटय़ा नोंदीही रेकॉर्डवर केल्या. ठेवीदारांच्या अनामत रक्कम जमा नसताना त्या दिल्याचे दर्शवून बंद पडलेल्या म्हसोबा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये संस्थेने गुंतवणूक केल्याचे दाखविले. अपहाराची ही रक्कम सुमारे १ कोटी ३१ लाख ६७ हजार १५४ इतकी असल्याचे लेखा परिक्षणामध्ये समोर आले. यानुसार अनिल पैलवान यांनी याबाबत चेअरमन, व्यवस्थापिका, रोखापाल व तीन लेखा परीक्षकांकडे विचारणा केली मात्र या सहा जणांनाही समाधानकारक उत्तर देता आले नाही. यामुळे या सहा जणांच्या विरोधात अनिल पैलवान यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात अपहाराचा तसेच फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.