मुंबई: सहा जूनला मान्सून दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने याआधी सांगितले होते. पण हवामान विभागाचा अंदाज चुकल्याने पुन्हा एकदा हवामान खात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र कालपासून कोकणात पावसाने हजेरी लावत हवामान विभागाला दिलासा दिला आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाने पुढील ४८ तासांत महाराष्ट्रासह देशातील काही प्रदेशात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे थांबलेली पेरणी पुन्हा सुर होईल अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

मध्य अरबी समुद्रासह, गोवा, दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडूचा काही भाग आणि दक्षिण आंध्र प्रदेशातील काही भागांत मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील 2 दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसेच कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा (Heavy Rain) अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे जळगाव, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे.