पुणे / प्रतिनिधी :
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने शनिवारी संपूर्ण देश व्यापला. सर्वसाधारणपणे 8 जुलैला देश व्यापणाऱ्या मान्सूनने यंदा आठवडाभर आधीच देश काबीज केला आहे.
यावर्षी मान्सून 16 मे रोजी अंदमानात, तर 29 मे रोजी केरळात दाखल झाला. तीन दिवस आधीच मान्सून केरळात दाखल झाला तरी, पोषक वातावरणाअभावी मध्यंतरी तो बराच काळ रेंगाळत राहिला. मान्सूनची पूर्व शाखा ही अधिक सक्रिय राहिल्याने या शाखेने पूर्वेकडचा बराचसा भाग व्यापला, तर पश्चिम शाखेने रखडत रखडत प्रवास केला. गेल्या आठवडय़ात मान्सूनला पश्चिम शाखेकडूनही अधिक बळ मिळाले. पोषक वातावरणामुळे या शाखेला गती मिळाल्याने मान्सून वेगाने पुढे सरकला. त्यामुळेच यंदा सहा दिवस आधीच मान्सूनने देश व्यापला आहे. शनिवारी अरबी समुद्राचा उर्वरित भाग, गुजरात, राजस्थानचा भाग व्यापत देश काबीज केला आहे.
जुलैमध्ये पाऊस सरासरीइतका
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला असून, या महिन्यात सरासरीइतका पाऊस राहण्याची चिन्हे आहेत. जुलै महिन्यात सर्वसाधारणपणे 280.4 मिमी पाऊस होतो. जुलैमध्ये उत्तर भारत, दक्षिण तसेच मध्य भारतात सरासरी ते सरासरीहून अधिक पाऊस राहील, तर पूर्व व पूर्वोत्तर भारतात तसेव दक्षिणेतल्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील. जुलै महिन्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस राहील. विदर्भात पाऊस सरासरीच्या कमी पाऊस राहील. गोव्यात पाऊस दमदार राहणार आहे, तर कर्नाटक किनारपट्टी वगळता कर्नाटक राज्यातही चांगला पाऊस राहणार आहे. पूर्वोतर भारत, पश्चिम बंगाल, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, राजस्थानचा काही भाग, जम्मू काश्मीरच्या काही भागात पाऊस कमी राहण्याची चिन्हे आहेत.
मान्सूनची सक्रियता वाढणार
येत्या 48 तासांत ओरिसा व लगतच्या भागात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार असून, त्याची वाटचाल वायव्य दिशेने होण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे दोन्ही शाखा सप्रिय होऊन महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.