प्रसाद नाकाडी मालिकावीर, आकाश कटांबले सामनावीर

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मंगाई स्पोर्टस् आयोजित रबरबॉल रेनीसिझन क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कडोली संघाने मराठी स्पोर्टस् संघाचा 11 धावांनी पराभव करुन मंगाई चषक पटकाविला. प्रसाद नाकाडी याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
वडगाव येथे मंगाई स्पोर्टस् क्लब आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ग्रामीण भागातून 8 व शहरी विभागातून 8 संघांना निमंत्रित करण्यात आले होते. शहरी संघात मर्यादित दोन वॉर्डमधून संघ निवडण्याची सक्ती करण्यात आली होती. पहिल्या उपांत्य सामन्यात कडोली संघाने कणबर्गी संघाचा 2 गडी राखून पराभव केला. श्री गणेश कणबर्गी संघाने 4 षटकात 44 धावा केल्या. त्याला उत्तर देताना कडोली संघाने 3.1 षटकात 45 धावा करुन सामना दोन गडय़ांनी जिंकला. आकाश कटांबलेने 20 धावा केल्या.
दुसऱया उपांत्य सामन्यात मराठा स्पोर्टस्ने एवन पॅकर्स संघाचा 24 धावांनी पराभव केला. मराठा स्पोर्टस्ने 4 षटकात 46 धावा केल्या. त्याला उत्तर देताना एवन पॅकर्स संघाने 4 षटकात 22 धावाच केल्या. अजिमने तीन गडी बाद केले.
अंतिम सामना कडोली व मराठा स्पोर्टस् यांच्यात झाला. कडोली संघाने 3 षटकात 33 धावा केल्या. आकाश कटांबलेने 12 धावा केल्या. मराठा स्पोर्टस्तर्फे प्रसाद नाकाडीने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मराठा स्पोर्टस् संघाने 3 षटकात सर्व बाद 21 धावाच जमविल्या. कडोलीतर्फे आकाश कटांबलेने 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे बाळकृष्ण तोपिनकट्टी, रमाकांत कोंडुसकर, विनायक पवार आदींच्या हस्ते विजेत्या कडोली संघाला 21 हजार 111 रुपये व आकर्षक चषक तर उपविजेत्या मराठा स्पोर्टस् संघाला 11 हजार 111 व चषक देवून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर आकाश कटांबले, उत्कृष्ट फलंदाज (कडोली), उत्कृष्ट गोलंदाज आजिम (मराठा), मालिकावीर प्रसाद नाकाडी यांना चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.