सांगली – मिरज रस्त्यावर अपघात, महिला जखमी, हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाताना काळाचा घाला
मिरज / प्रतिनिधी
दूध वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोची धडक बसल्याने मोटारसायकलीवरील चालकाचा मृत्यू झाला. रायगोंडा बेळंकी (वय 65, रा. सुभाषनगर, मिरज) असे अपघातात मयत झालेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. तर त्यांच्या पत्नी सुशिला बेळंकी (वय 58) या गंभीर जखमी झाल्या आहेत. मिरज-सांगली रस्त्यावर हा अपघात झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत महात्मा गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
रायगोंडा बेळंकी हे पत्नी सुशिला बेळंकी यांना सोबत घेऊन (एमएच-10-बी-2780) या मोटारसायकलवरुन सांगली-मिरज रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी चालले होते. यावेळी भरधाव वेगाने येणारी दूध वाहतूक टेम्पो (एमएच-10-सीआर-3097) ची जोरदार धडक बसली. या अपघातात दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच गांधी चौकी पोलिसांनी अपघातीस्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना रायगोंड बेळंकी यांचा मृत्यू झाला. तर सुशिला बेळंकी या गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करून अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
रायगोंडा बेळंकी आणि त्यांच्या पत्नी सुशीला हे दोघेजण उपचारासाठी खाजगी रुग्णालयात जात होते. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधी त्यांच्यावर काळाने घाला घातला. वृद्ध दाम्पत्याचा अपघात होऊन पतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने अपघाताबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.