छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प बसविण्याची मागणी
बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा बसवाव्यात, या मागणीसाठी रविवारी दलित संघटनांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. दलित संघर्ष समितीने रेल्वेस्थानकासमोर उग्र आंदोलन करत रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यामुळे काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले असून सोमवार दि. 27 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाची तयारी केली जात असताना रविवारी दलित संघर्ष समितीने रेल्वेस्थानकावर आंदोलन केले. इतर प्रतिमांप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प बसविण्याची मागणी करण्यात आली. रेल्वेस्थानकाच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रतिमा प्रवेशद्वारासमोर ठेवून आंदोलन करण्यात आले. तयार केलेल्या प्रतिमा अडगळीत ठेवल्याबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
रोहित पवारांनी व्यक्त केली नाराजी
बेळगाव रेल्वेस्थानकात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा बसविण्यास रेल्वे प्रशासनाकडून नकार देण्यात आला. या विरोधात दलित संघर्ष समितीने आंदोलन केले. याबाबत आपले मत मांडताना कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत मराठी भाषिकांचा इतका द्वेष का? असा सवाल उपस्थित करत रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली.