जिल्हाप्रमुख विजय देवणे यांची माहिती; शिवसैनिक पुन्हा आक्रमक
कोल्हापूर प्रतिनिधी
गेले ते बेंटेक्स, उरल ते सोन असं म्हणणारे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक स्वतःच बेंटेक्स निघाले. कठीण काळात शिवसैनिकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला, पण त्यांनी गद्दारी करत शिंदे गटाचा मार्ग धरला, अशा गद्दार बेंटेक्स खासदारांचा निषेध करण्यासाठी सोमवार 8 रोजी खासदार मंडलिक यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानावर मोर्चा काढणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देवणे म्हणाले, खासदार संजय मंडलिक आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अस्तित्वासाठी शिवसेनेने जिल्हा बँकेची निवडणुक लढली. आबिटकरांना मोठया प्रमाणात निधी देवूनही आबिटकर यांनी गद्दारी केली. खासदार मंडलिक यांच्यावर जिल्हय़ातील शिवसैनिकांनी विश्वास टाकला. जिल्हय़ाचे नेतृत्व त्यांच्याकडे दिले. मात्र त्यांनीही अचानक भुमिका बदलत शिवसेनेशी गद्दारी केली. मात्र 2024®³ee लोकसभा निवडणुकीत शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवत त्यांना पराभूत करतील असा विश्वास देवणे व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, सोमवार 8 रोजी शिवाजी पार्क येथील शाहूपुरी जिमखाना मैदानावरुन खासदार मंडलिक यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता मोर्चास प्रारंभ होईल. तरी शिवसैनिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख देवणे यांनी केले. पत्रकार परिषदेला शहरप्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, समन्वयक हर्षल सुर्वे आदी उपस्थित होते.
पराभूत झालेल्यांचा विचार करत नाही
बंडखोर आमदार, खासदार यांच्या निवासस्थानावर मोर्चे काढण्यात आलेत. पुढील काळात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार का असा प्रश्न उपस्थित केला असता जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी पराभूत झालेल्यांचा आम्ही विचार करत नाही, असे उत्तर दिले.
शाहू समाधी स्थाळासाठी निधी संकलन आंदोलन
राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक स्थळासाठीचा निधी शिंदे सरकारने रोखला आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेकडून शाहू समाधी स्थळासाठी निधी संकलन आंदोलन करण्यात येणार आहे. बिनखांबी गणेश मंदिर येथून झोळी घेवून निधी संकलित केला पाहीजे. महाद्वार रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा येईल. यादरम्यान संकलित होणार निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले.