तेलंगणातील ‘वायएसआरसीपी’ला दणका
हैदराबाद / वृत्तसंस्था
दिल्ली मद्य घोटाळय़ाप्रकरणी वायएसआरसीपी खासदार मागुंता श्रीनिवासुलु रेड्डी यांचा मुलगा मागुंता राघव याला ईडीने अटक केली आहे. यापूर्वी ईडीने तेलंगणातील चार्टर्ड अकाउंटंट, केसीआर यांची मुलगी कविता हिच्या माजी ऑडिटरला दिल्ली मद्य प्रकरणात अटक केली आहे. ईडीने याप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपपत्रे किंवा फिर्यादी तक्रारी दाखल केल्या असून एकूण 9 जणांना अटक केली आहे. मागुंता राघव याला या प्रकरणात कथित अनियमितता आणि मनी लाँड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून अटक करण्यात आली आहे. गेल्या एका आठवडय़ातील या प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. राघवला ईडी लवकरच स्थानिक न्यायालयात हजर करून त्याला रिमांडवर घेऊन पुढील चौकशी करणार आहे.
दिल्लीच्या अबकारी घोटाळय़ाचे धागेदोरे दक्षिणेकडील राजकीय पक्ष ‘वायएसआरसीपी’शी जोडले गेले आहे. याप्रकरणी मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने वायएसआरसीपी खासदार मागुंता श्रीनिवासुलु रेड्डी यांचा मुलगा मागुंता राघव याला अटक केली आहे. यापूर्वी, दिल्ली न्यायालयाने एका जाहिरात कंपनीच्या संचालकाला दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात चौकशीसाठी ईडी कोठडीत पाठवले होते. ईडी या जाहिरात कंपनीच्या संचालकाच्या माध्यमातून मागुंता राघव यांच्यापर्यंत पोहोचल्याचा दावा केला जात आहे. जाहिरात कंपनीच्या संचालकाने 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पार्टीसाठी काम केले होते. या प्रकरणाशी संबंध जोडताना ईडीने चेरियट प्रॉडक्शन मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक राजेश जोशी यांना विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांच्यासमोर हजर केले. तेथून आरोपीला 13 फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी जोशीला अटक केली होती.