निवडणूक पुढे ढकलण्याच्या सूचनेची इतिवृत्तात नोंद नाही
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी सूचना खासदार इराण्णा कडाडी यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सर्वसाधारण बैठकीत मांडली होती. तसेच बैठकीच्या इतिवृत्तात सूचनेची नोंद करावी, असे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितले होते. पण खासदारांच्या सूचनेची नोंद करण्याकडे दुर्लक्ष करून कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या असल्याचे निदर्शनास आले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण बैठक बुधवार दि. 22 रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले होते. या बैठकीला खासदार इराण्णा कडाडी आणि आमदार अनिल बेनके आवर्जून उपस्थित होते. यावेळी कामगार भरती तसेच विविध विषयांवर चर्चा करून सूचना केल्या होत्या व आम्ही केलेल्या सूचनेची नोंद बैठकीच्या इतिवृत्तात करण्यात यावी, असे खासदार इराण्णा कडाडी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांना सांगितले होते. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका 30 एप्रिलपर्यंत घेण्याची अधिसूचना संरक्षण खात्याने जारी केली होती. त्यामुळे हा विषय कॅन्टोन्मेंट बोर्ड सर्वसाधारण बैठकीच्या अजेंड्यावर घेण्यात आला होता. निवडणुका घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र कॅन्टोन्मेंटकडे पुरेसा निधी नाही, शाळेच्या परीक्षा आहेत. तसेच विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी सूचना खासदार इराण्णा कडाडी आणि आमदार अनिल बेनके यांनी मांडली होती.
संरक्षण खात्याने तारीख निश्चित केली असून, आपल्याला तारीख बदलता येत नाही, असे कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी सांगितले. हे सर्व मान्य असून माझी सूचना इतिवृत्तात नोंद करून शासनाकडे पाठवा, असे खासदार इराण्णा कडाडी यांनी सुचित केले होते. मात्र कॅन्टोन्मेंट प्रशासनाने खासदारांच्या सूचनेची नोंद इतिवृत्तात केली नसल्याचे निदर्शनास आले. खासदार कडाडी यांनी सातत्याने सूचित करूनदेखील कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांनी त्यांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. खासदार, आमदारांच्या सूचनेची दखल कॅन्टोन्मेंटकडून घेतली जात नाही, अशी तक्रार सातत्याने केली जाते. आमच्या सूचनांची नोंद घेणार नसाल तर बैठकीला कशाला बोलावता? असा मुद्दा खासदारांनी बैठकीवेळी उपस्थित केला. तरीदेखील कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांनी खासदार कडाडी यांच्या सूचनेची नोंद घेतली नाही. कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा आपला हेकेखोरपणा दर्शवून खासदारांच्या सूचनेला केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे खासदार कडाडी याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे कॅन्टोन्मेंटवासियांचे लक्ष लागले आहे.