प्राण्यांसाठी अभिनेत्री करणार काम
अभिनेत्री मृणाल ठाकूर ही बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मृणाल सध्या ‘सीता रामम’ या चित्रपटामधील भूमिकेमुळे चर्चेत आहे. याचबरोबर तिने एका सामाजिका कार्यात भाग घेत चाहत्यांची मने जिंकली आहेत. मृणालने भटक्या प्राण्यांना अन्नदान करणाऱया एका मोहिमेत सामील होत प्राण्यांबद्दलचे स्वतःचे प्रेम व्यक्त केले आहे.
मृणालने अलिकडेच स्वतःच्या घरात दोन मांजरांचे स्वागत केले आहे. मृणाल या मांजरांसोबत वेळ घालविताना दिसून येते. मृणालने इन्स्टाग्रामवर या प्राण्यांसोबतची छायाचित्रे तसेच व्हिडिओ शेअर केले असून त्यांना चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. मृणाल आता भटक्या प्राण्यांना मदत करणाऱया ‘फौंडेशन ऑल अबाउट देम’सोबत मिळून फूड डोनेशन मोहीम चालविणार आहे. या मोहिमेचा उद्देश भटक्या प्राण्यांना अन्न मिळवून देण्याचा आहे. प्राण्यांसाठी काहीतरी करण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी आहे. अन्य पाळीव प्राण्यांप्रमाणेच भटके प्राणीही प्रेमास पात्र आहेत, मी कुठल्याही प्रकारे अशा प्राण्यांना मदत करू इच्छिते. ही मोहीम भटक्या प्राण्यांना अन्न मिळवून देण्यावर केंद्रीत असून मी या महत्त्वपूर्ण कार्यात सामील होण्यासाठी उत्सुक असल्याचे मृणालने म्हटले आहे.