पावसामुळे खड्ड्यांतील काँक्रीट बाहेर : २४ तास काम करूनही खड्डे बुजेनात
प्रतिनिधी/चिपळूण
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात व त्यानंतर कोकणातील आमदार, खासदारांच्या बैठकीत मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे २५ ऑगस्टपर्यत भरण्याची ग्वाही दिल्यानंतर मंत्री रविंद्र चव्हाण (Minister Ravindra Chavan) स्वत: २६ रोजी महामार्ग पाहणीसाठी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मात्र पाऊस, खड्ड्यांची संख्या लक्षात घेता महामार्गावर २४ तास मोहीम राबवूनही खड्डे बुजता बुजेनात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बांधकाम मंत्र्यांचे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता कशेडी घाटात आगमन होणार असून ते महामार्गाच्या दुरूस्ती कामाची पाहणा करत ५.३० वाजता परशुराम घाटात येणार आहेत. त्यानंतर ६.३० वाजता शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेऊन ते रत्नागिरीला निघणार आहेत. मंत्री चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशनात महामार्गावरील खड्ड्यांबाबत उपस्थित प्रश्नावर बोलताना २५ ऑगस्टपूर्वी खड्डे पूर्णपणे भरण्याचे तसेच २६ रोजी स्वत: महामार्गाचा पाहणी दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते.

सध्या मुंबई-गोवा महामार्गावर २४ ठिकाणी खड्डे आहेत. यापैकी वाकण पट्ट्यात सर्वाधिक म्हणजे ८ ठिकाणी आाणि महाड पट्ट्यात ७ ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी-पोलादपूर सडवली नदी पूल ते खवटी पर्यंत, भरणे नाका खेड येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस. परशुराम घाट, बहादूर शेख नाका ते चिपळूण पाॅवरहाऊस, आरवली एसटी स्थानक ते बावनदी या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याचा महामार्ग विभागाचा अहवाल सांगत आहे. त्यामुळे खड्डे भरण्यासाठी कंत्राटदार कंपन्यानी दिवस-रात्र मोहीम राबवली आहे.