आयपीएल साखळी सामन्यात आज चेन्नईविरुद्ध नशीब आजमावणार
नवी मुंबई / वृत्तसंस्था
सलग 6 पराभवांमुळे आयपीएल स्पर्धेतून ‘एक्झिट’च्या उंबरठय़ावर पोहोचलेल्या मुंबई इंडियन्सची आज (गुरुवार दि. 21) चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध साखळी लढत होत आहे. स्पर्धेतील अस्तित्व कायम राखायचे असेल तर मुंबईला ही लढत कोणत्याही परिस्थितीत जिंकणे अटळ असेल. या सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे.
आयपीएल इतिहासात आजवर पाचवेळा चॅम्पियन्स ठरलेल्या मुंबईला यंदा अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही आणि आज चेन्नईविरुद्ध पराभव पत्करल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात येणार आहे. विद्यमान विजेता चेन्नईचा संघ देखील 6 सामन्यात 5 पराभवांसह तळाच्या लाईनअपमध्येच आहे. चेन्नईला आज पराभव पत्करावा लागल्यास हा त्यांचा सहावा पराभव असेल आणि त्यांची स्थितीही मुंबईप्रमाणे होणार आहे.
मुंबई इंडियन्ससाठी कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म ही मुख्य चिंतेची बाब आहे. रोहितला 6 डावात केवळ 114 धावा जमवता आल्या असून मुंबईला धावांचा डोंगर रचायचा असेल किंवा धावांचा यशस्वी पाठलाग करायचा असेल तरीही प्रामुख्याने रोहितला सूर सापडणे आवश्यक ठरणार आहे. मुंबईकर युवा फलंदाज इशान किशन आपल्याला मिळालेली 15.25 कोटी रुपयांची बोली अद्याप सार्थ ठरवू शकलेला नाही. डेव्हॉल्ड ब्रेविस, तिलक वर्मा व सूर्यकुमार यादव यांनी काही उत्तम डाव रचले. पण, मध्यफळीत सांघिक कामगिरी होत नाही, ही या संघाची डोकेदुखी ठरत आहे.
अष्टपैलू केरॉन पोलार्डने देखील मुंबईची अद्याप निराशाच केली आहे. एकहाती सामने जिंकून देण्याची कला विसरल्याप्रमाणे पोलार्डची स्थिती आहे. आतापर्यंत अवघ्या 82 धावा जमवता आल्याने पोलार्डच्या रिटेन्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मुंबईचा संघ फलंदाजीत उत्तम असला तरी सांघिक योगदान नसल्याने त्यांची सातत्याने निराशा होत आली आहे. त्या तुलनेत चेन्नई सुपरकिंग्सच्या गोलंदाजी लाईनअपमध्ये अनुभवाची कमतरता असल्याने याचा मुंबईला लाभ घेता येणार का, हे आजच्या लढतीत स्पष्ट होईल.
मुंबईला ज्याप्रमाणे फलंदाजीत चिंता आहेत, त्याचप्रमाणे गोलंदाजीत अडचणींचा डोंगर आहे. जसप्रित बुमराहचा अपवाद वगळला तर मुंबईचा एकही गोलंदाज प्रभावी ठरु शकलेला नाही. टायमल मिल्स, जयदेव उनादकट, बसिल थम्पी, लीड स्पिनर मुरुगन अश्विन हे सर्व गोलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत. मिल्सला लखनौविरुद्ध मागील लढतीत 3 षटकात 54 धावा मोजाव्या लागल्या तर उनादकट व अश्विन यांनी अनुक्रमे 32 व 33 धावा दिल्या. मुंबईने फॅबियन ऍलनचा पर्याय आजमावला. पण, त्याचीही चांगलीच धुलाई झाली. त्याला 4 षटकात 46 धावा मोजाव्या लागल्या.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, बसिल थम्पी, ऋतिक शौकीन, जसप्रित बुमराह, जयदेव उनादकट, जोफ्रा आर्चर, मयांक मार्कंडे, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ, टायमल मिल्स, अर्शद खान, डॅनिएल सॅम्स, डेव्हॉल्ड ब्रेविस, फॅबियन ऍलन, केरॉन पोलार्ड, संजय यादव, आर्यन जुयल, इशान किशन.
चेन्नई सुपरकिंग्स ः रविंद्र जडेजा (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन ब्रेव्हो, अम्बाती रायुडू, रॉबिन उत्थप्पा, मिशेल सॅन्टनर, ख्रिस जॉर्डन, ऍडम मिल्ने, डेव्हॉन कॉनव्हे, शिवम दुबे, डेव्हॉन प्रिटोरियस, महिश तिक्षणा, राजवर्धन हंगरगेकर, तुषार देशपांडे, केएम असिफ, सी. हरी निशांत, एन. जगदीशन, सुब्रांशू सेनापती, के. भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, सिमरनजित सिंग, मुकेश चौधरी.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा. )
ऋतुराज गायकवाडला सूर सापडल्याने चेन्नईला दिलासा
यापूर्वी, गुजरात टायटन्सविरुद्ध लढतीत ऋतुराज गायकवाडला सूर सापडल्याने चेन्नई सुपरकिंग्स संघासाठी ही दिलासादायक बाब ठरली. ऋतुराजने गुजरातविरुद्ध 48 चेंडूत 73 धावांची आतषबाजी केली. चेन्नईने आरसीबीविरुद्ध या हंगामातील आतापर्यंतचा एकमेव विजय मिळवला, त्यावेळी रॉबिन उत्थप्पा व शिवम दुबे यांनी चमक दाखवली होती. आता दुबेला ‘वन मॅच वंडर’चा टॅग खोडून काढण्यासाठी येथे नेटाने फलंदाजी करावी लागेल. अम्बाती रायुडू, पिंच हिटर मोईन अली अद्याप पूर्ण बहरात येणे बाकी आहे.
कर्णधार रविंद्र जडेजा व महेंद्रसिंग धोनी संघासाठी फिनिशिरची जबाबदारी चोख पार पाडू शकतात. जडेजा अद्याप गोलंदाजीत भेदकता दाखवून देऊ शकलेला नाही. मुंबईच्या हिटर्सना सूर सापडल्यास त्यांना रोखण्याची जबाबदारी जडेजाला शिरावर घ्यावी लागू शकते. डेव्हॉन ब्रेव्हो व फिरकीपटू महिश तीक्षणा यांचा अपवाद वगळता चेन्नईचे गोलंदाज बरेच निष्प्रभ ठरत आले आहेत. मुकेश चौधरी सातत्याने महागडा ठरत आला असून ख्रिस जॉर्डनला गुजरातविरुद्ध 58 धावा मोजाव्या लागल्या. दीपक चहर यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्याने आणि ऍडम मिल्ने अद्याप पूर्ण तंदुरुस्त नसल्याने चेन्नईला तोवर सध्याच्या गोलंदाजांवरच अवलंबून रहावे लागेल, हे निश्चित आहे.
मुंबई इंडियन्सची हंगामातील कामगिरी
तारीख / प्रतिस्पर्धी / ठिकाण / निकाल
27 मार्च / दिल्ली / ब्रेबॉर्न / मुंबई 4 गडय़ांनी पराभूत
2 एप्रिल / राजस्थान / डीवाय / मुंबई 23 धावांनी पराभूत
6 एप्रिल / केकेआर / पुणे / मुंबई 5 गडय़ांनी पराभूत
9 एप्रिल / आरसीबी / पुणे / मुंबई 7 गडय़ांनी पराभूत
13 एप्रिल / पंजाब / पुणे / मुंबई 12 धावांनी पराभूत
16 एप्रिल / लखनौ / ब्रेबॉर्न / मुंबई 18 धावांनी पराभूत