सामनावीर सायका इशाकची भेदक गोलंदाजी, दिल्ली कॅपिटल्स 8 गडय़ांनी पराभूत
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
येथे सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्याच प्रिमियर लीग टी-20 स्पर्धेत कर्णधार हरमनप्रित कौरच्या मुंबई इंडियन्स संघाने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना सलग तिसरा विजय नोंदविला. गुरुवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात नवोदित गोलंदाज सायका इशाकच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडय़ांनी दणदणीत पराभव केला.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. दिल्ली कॅपिटल्सचा डाव 18 षटकात 105 धावात आटोपला. दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लेनिंगने 41 चेंडूत 5 चौकारांसह 43 तर रॉड्रिग्जने 18 चेंडूत 3 चौकारांसह 25 व राधा यादवने 1 षटकारासह 9 चेंडूत 10 धावा जमविल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या उर्वरित फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. लेनिंगने रॉड्रिग्जसमवेत चौथ्या गडय़ासाठी 50 धावांची भागीदारी केली. मुंबई इंडियन्स संघातील नवोदित गोलंदाज सायका इशाकने आपल्या 3 षटकात 13 धावात 3 तसेच वाँगने 10 धावात 3 आणि हिली मॅथ्यूजने 19 धावात 3 गडी बाद केले. पूजा वस्त्रकरने 1 बळी मिळविला. दिल्ली कॅपिटल्सच्या डावात 1 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबई इंडियन्सच्या डावाला यास्तिका भाटिया आणि हिली मॅथ्यूज यांनी दमदार सुरुवात करून दिली. या जोडीने 8.5 षटकात 65 धावांची भागीदारी केली. दिल्ली कॅपिटल्सच्या नोरीसने 9 व्या षटकात भाटियाला पायचीत केले. तिने 32 चेंडूत 8 चौकारांसह 41 धावा जमविल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या कॅप्सेने मॅथ्यूजला रॉड्रिग्जकरवी झेलबाद केले. तिने 31 चेंडूत 6 चौकारांसह 32 धावा जमविल्या. मुंबई इंडियन्सचा हा दुसरा फलंदाज 12 व्या षटकात बाद झाला. त्यानंतर उर्वरित 5 षटकांमध्ये मुंबई इंडियन्सच्या नॅट स्कीव्हेर बंट आणि कर्णधार हरमनप्रित कौर यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. बंटने 19 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 23 तर कौरने 8 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 11 धावा जमविल्या. मुंबई इंडियन्सच्या डावात 20 चौकार नोंदविले गेले. दिल्ली कॅपिटल्सतर्फे कॅप्से आणि नोरीस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या स्पर्धेमध्ये इशाकने तीन सामन्यातून एकूण 9 बळी घेतले आहेत.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिटल्स 18 षटकात सर्वबाद 105 (लेनिंग 43, रॉड्रिग्ज 25, राधा यादव 10, कॅप्से 6, सायका इशाक 3-13, वाँग 3-10, मॅथ्यूज 3-19, वस्त्रकर 1-6), मुंबई इंडियन्स 15 षटकात 2 बाद 109 (यास्तिका भाटिया 41, मॅथ्यूज 32, नॅट स्कीव्हेर बंट नाबाद 23, हरमनप्रित कौर नाबाद 11, अवांतर 2, कॅप्से 1-14, नोरीस 1-4).