ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिंदे गटात गेलेले आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. टॉप ग्रुप सिक्युरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने २४ नोव्हेंबरला प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक यांच्या घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अटकेपासून संरक्षण दिले आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणात कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला. त्यानंतर आता ईडीदेखील याच अहवालाच्या आधारे क्लोजर रिपोर्ट सादर करणार असल्याची चर्चा आहे. तपासात प्रगती होत नसल्याने क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या आदेशानुसार, प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर कुठलीही कारवाई करु नये, असे आदेश दिले आहेत. ईडी सरनाईक कुटुंबाला चौकशीसाठी बोलवू शकते. मात्र त्यांना अटक करु शकत नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान प्रताप सरनाईक यांनी काल (८ डिसेंबर) सहकुटुंब मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. याचे व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले होते. यानंतर आज सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय आल्याने सरनाईकांना बाप्पा पावला असे बोललं जातं आहे.
हे ही वाचा : आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत निष्काळजीपणा; ‘झेड’ दर्जाच्या सुरक्षेसाठी खासगी गाड्या घेऊन आले सुरक्षारक्षक
ईडीच्या अटकेत असलेले अमित चांदोले हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय आहेत. मूळ प्रकरणात ईओडब्ल्यूनं सादर केलेला ‘सी समरी’ रिपोर्ट दंडाधिकारी कोर्टानं स्वीकारला आहे. त्यामुळे आता ईडीनं दाखल करून घेतलेल्या प्रकरणाला अर्थ उरत नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानं पीएमएलए संदर्भात नुकत्याच दिलेल्या निकालावर ही याचिका आधारीत आहे. याच निकालानुसार मुंबई सत्र न्यायालयानं नुकतीच ओमकार ग्रुपच्या दोन विकासकांची निर्दोष मुक्तता केली आहे. तर मुंबई सत्र न्यायालयाकडून ईडीला २१ सप्टेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तोपर्यंत आरोपी चांदोले आणि शशिधरन यांना कोठडीतच ठेवण्याचे निर्देशही कोर्टाने दिले.