खुनानंतर मृतदेह टाकला कदंब पठारावर : संशयित चार तासांच्या आत गजाआड,ओल्ड गोवा पोलिसांची यशस्वी कामगीरी

प्रतिनिधी /पणजी
खोर्ली मळार, तिसवाडी येथील प्रायमोस कॉलनीत राहणाऱया प्रा. गौरी आचारी (35) हिचा खून झाला असून या प्रकरणात ओल्ड गोवा पोलिसांनी अवघ्या चार तासात संशयिताला गजाआड केले आहे. संशयिताच्या विरोधात भादंसं 302 तसेच 201 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. प्रेमप्रकरणाच्या वादातून हा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताचे नाव गौरव प्रकाश बिद्रे (36, मूळ खासकीलवाडा, सावंतवाडी-सिंधुदुर्ग) असे आहे. गौरी आचारी ही खांडोळा येथील महाविद्यालयात शिकवित होती. उच्च विद्याभूषित असलेली गौरी रोज संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत घरी पोहोचत होती. गुरुवारी रात्री घरी न आल्यामुळे शुक्रवारी सकाळी तिच्या आईने ओल्ड गोवा पोलिसस्थानकात तक्रार दाखल केली होती.
आईने दिला गौरवाचा फोटो
पोलिसांनी तपासकामाला सुरुवात केली तेव्हा अगोदर खोर्ली परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तिच्या आईकडे चौकशी करून गौरीच्या मित्रमैत्रिणी संदर्भात माहिती मिळविली. संशयित गौरव बिद्रे याचा फोटो दाखवून ही व्यक्ती गौरीसोबत नेहमी भांडण करत असे, अशी माहिती गौरीच्या आईने पोलिसांना दिली होती. त्यामुळे पुढील तपास गतीने झाला.
चार तासांतच लावला छडा
गौरीच्या आईकडून मिळालेल्या माहितीनुसार अवघ्या चार तासातच संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याची उलटतपासणी सुरु केली होती. सुरुवातीला संशयिताने नाटके करायला सुरुवात केली होती, मात्र खाकीचा प्रसाद मिळाल्यावर तो सत्य बोलू लागला. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ओल्ड गोवा कदंब पठारावरील सहापदरी महामार्गाकडे जाऊन तेथे झुडूपात टाकलेला मृतदेह ताब्यात घेतला.
गौरीला मित्र गौरव ठरला घातक
मूळ सावंतवाडीचा असलेला गौरव बिद्रे हा जीम इन्स्ट्रक्टर म्हणून काम करीत होता. त्याचा स्वतःचा जीम नाही. गरजू व्यक्तींना तो जीमचे ट्रेनिंग देण्याचे काम करीत होता. तेवढीच त्याची कमाई होती. आपण जून 2021 पासून प्रा. गौरी आचारी हिला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली होती. मध्यंतरीच्या काळात आपल्या दोघांची मैत्री जमली होती, असे गौरवने पोलिसांना सांगितले. मैत्री होती म्हणून सांगणारा गौरव अखेर गौरीला घातक ठरला.
गौरीने दिला होता स्पष्ट नकार
गौरव बिदे हा विवाहीत असून त्याला एक मुलगा आहे हे जेव्हा गौरीला समजले तेव्हा तिने त्याचा प्रेमाचा प्रस्ताव नाकारला आणि त्याच्याकडे जीम ट्रेनिंगसाठी जाणे बंद केले होते. मात्र तो एकतर्फी प्रेमाने पागल झाला होता.
ठरवून काढला काटा
गौरी ही प्रध्यापक म्हणून काम करीत होती. लग्न झाल्यावर गौरीचा पगार हे आपल्या पैशाचे साधन होऊ शकते. त्यामुळे कुठल्याही स्थितीत तो गौरीला सोडण्यास तयार नव्हता. त्यासाठी त्याने बायकोला घटस्फोटही देण्याची तयारी केली होती. गौरी ऐकत नसल्याने तिचा काटा काढण्याचे त्याने निश्चित केले होते, अशी कबुली त्याने दिली आहे.
गौरीच्या घराजवळच केला खून
गौरी नियमित संध्याकाळी घरी येते, हे गौरवला माहीत होते. गुरुवारी संध्याकाळी खोर्ली येथील तिच्या घराजवळ तो दबा धरून बसला होता. ठरल्या वेळेत गौरी आपल्या नॅनो कारने घरी आली. गौरवने तिला अडविले. दोघांच्यात वाद सुरु झाले आणि त्याच्यातच गौरीचा खून करण्यात आला, अशीही कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. गौरीची बॅग तसेच चप्पला तिच्या कारजवळ पडलेल्या होत्या. तसेच कारला चावीसुध्द केली नव्हती. एवढे सारेकाही तिच्या घराजवळच होऊनही कुणालाही त्याची जराही कल्पना आली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
गौरव एवढेच करुन थांबला नाही, तर मृतदेह आपल्या गाडीत घालून ओल्ड गोवा येथील कदंब पठारावर नेऊन झुडुपात टाकला. गौरीच्या घरी तिच्या गाडीजवळ पडलेली बॅग आणि चप्पल तसेच गाडीला चावी केलेली नसल्याचे पाहून पोलिसांनी हा घातपातच असावा असा अंदाज केला होता. गौरीच्या आईने त्याचा फोटो पोलिसांना दिल्याने अवघ्या काही तासातच संशयिताला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
गौरीच्या मृतदेहाची चिकित्सा करून शवागरात ठेवण्यात आला आहे. ओल्ड गोवा पोलीस पुढील तपास करीत आहेत.