गळा चिरून केली हत्या : मृतदेह चिल्ड्रन पार्कमधील बाकडय़ावर बसविल्याने खळबळ
प्रतिनिधी / बेळगाव
यरमाळ रोड, वडगाव येथील एका गवंडी कामगाराचा खून करण्यात आला आहे. गळा चिरून खून करून त्याचा मृतदेह नाझर कॅम्प परिसरातील चिल्ड्रन पार्कमधील एका बाकडय़ावर बसविण्यात आला होता. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे.
शंकर ऊर्फ बाळू मारुती पाटील (वय 40) असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. तो सेंट्रिंग व गवंडी काम करत होता. गुरुवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास खुनाचा हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती मिळताच शहापूरचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
तीक्ष्ण हत्याराने बाळूचा गळा चिरण्यात आला आहे. इतरत्र खून करून त्याचा मृतदेह फुले गल्ली-नाझर कॅम्प-वडगाव येथील चिल्ड्रन पार्कमधील बाकडय़ावर बसविण्यात आला आहे.
ज्या बाकडय़ावर बाळूचा मृतदेह आढळून आला त्यावर रक्ताचा एक थेंबही पडला नव्हता. बाळूचा खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला आहे, याचा उलगडा झाला नाही.
लहानपणीच आई-वडिलांचे निधन झाले आहे. घरात बाळू एकटाच राहत होता. त्याच्या तीन बहिणींची लग्ने झाली आहेत. त्याही यरमाळ रोड परिसरातच राहतात. बाळूचा भाचा सचिन बसवंत रणदिवे (वय 38) याने शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून भा.दं.वि. 201, 302 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मंगळवार दि. 12 एप्रिलच्या सकाळपासून बाळू बेपत्ता होता. तिसऱया दिवशी खून झालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
खुनांची मालिका सुरूच
बेळगाव शहर व तालुक्मयात नववर्षात खुनांची मालिका सुरूच आहे. आर्थिक व्यवहार, अनैतिक संबंध, क्षुल्लक कारणावरून झालेले भांडण आदींमुळे एकापाठोपाठ एक खुनांचे प्रकार घडत आहेत. सुपारी घेऊन खून करण्याचा प्रकारही घडला आहे. खुनांची मालिका कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित केला जात असून वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे.
तपास…
- खुनाचे कारण गुलदस्त्यात
- शहापूर पोलिसात एफआयआर
- 12 एप्रिलपासून होता बेपत्ता