वार्ताहर /सांबरा
मुतगे ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत म. ए. समिती पुरस्कृत ग्राम विकास आघाडीचे किरण कल्लाप्पा पाटील यांनी 11 मते घेत बाजी मारली तर सुनील वसंत चौगुले यांना 8 मतांवर समाधान मानावे लागले.
किरण पाटील यांच्या विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करून व फटाक्मयांची अतिषबाजी करून आनंद व्यक्त केला.मुतगा ग्रा.पं.मध्ये म. ए. समिती पुरस्कृत ग्राम विकास आघाडीचे वर्चस्व आहे. अध्यक्षपदासाठी भालचंद्र पाटील व किरण पाटील हे दोघे मुख्य दावेदार होते. त्यामुळे दोघांना प्रत्येकी 15 महिन्यांसाठी अध्यक्षपद वाटून देण्याचे ग्राम विकास आघाडीने ठरविले होते. त्यानुसार भालचंद्र पाटील यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाच्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार दि. 15 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी ग्राम विकास आघाडीचे किरण कल्लाप्पा पाटील यांनी व सुनील वसंत चौगुले यांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर मतदान घेण्यात आले.त्यामध्ये किरण कल्लाप्पा पाटील यांनी अकरा मते घेऊन अध्यक्षपद पटकावले. श्याम मुतगेकर, भालचंद्र पाटील, सुधीर पाटील, प्रभाकर पाटील, रेश्मा पाटील, बबिता पाटील, भारता पाटील, भाग्यश्री पाटील, स्नेहल पुजारी व शिला मल्लवगोळ यांनी किरण पाटील यांना मतदान केले. तर सुनील वसंत चौगुले यांना आठ मते पडली. निवडणूक अधिकारी म्हणून शहर शिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांनी काम पाहिले.