पुणे / प्रतिनिधी :
वर्धा येथे होणाऱ्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक, विचारवंत, निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर (Narendra Chapalgaonkar) यांची मंगळवारी निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, येत्या 3 ते 5 फेब्रुवारी 2023 या कालावधीत हे संमेलन रंगणार आहे.
साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली. यात विविध घटक संस्थांकडून प्राप्त झालेल्या नावांवर चर्चा करण्यात आली. संमेलनासाठी चपळगावकर यांच्यासोबतच ज्येष्ठ पत्रकार-साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, बैठकीत चपळगावकर यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. विदर्भ साहित्य संघाचे यंदाचे शताब्दी वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धानगरीत येत्या 3 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान हे संमेलन होणार असून, निवृत्त न्या. चपळगावकर यांच्या निवडीने सर्व स्तरांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक वाचा : शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, पाचवीचा 23.90, तर आठवीचा निकाल 12.54 टक्के
चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायाधीश असून, वैचारिक लेखन करणारे संवेदनशील व सत्त्वशील मराठी लेखक म्हणून ते खातकीर्त आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते 1961-62 मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. नरहर कुरुंदकर न्यासाचे विश्वस्त म्हणूनही ते काम पाहतात. आपल्या व्यासंगी व चिंतनशील लेखनातून मराठी साहित्याला वेगळय़ा उंचीवर नेण्याचे काम चपळगावकर यांनी केले आहे.