नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कॅनडास्थित खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) च्या दहशतवाद्याचा ठावठिकाणा सांगणाऱयास किंवा त्याला पकडून देणाऱयास 10 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाईल, अशी घोषणा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) केली आहे. हरदीपसिंग नज्जर असे या दहशतवाद्याचे नाव असून त्याच्यावर पंजाबमधील जालंदर येथे एका हिंदू पुरोहिताची हत्या केल्याचा आरोप आहे. नज्जर हा जालंदर जिल्हय़ातील भरसिंगपूर येथील रहिवासी आहे. तो सध्या कॅनडात वास्तव्यास असल्याची माहिती आहे. शीख समुदायाला न्याय मिळावा म्हणून आपण संघर्ष करीत आहोत, असा नज्जर याचा दावा असला तरी प्रत्यक्षात तो शीख तरुणांना भडकावित असून त्यांना दहशतवादाच्या मार्गाकडे वळविण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.