
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
विश्व मुष्टियुद्ध फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या महिलांच्या विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धेत यजमान भारताची किमान चार पदके निश्चित झाली आहेत. या स्पर्धेत भारताच्या निखत झरीन आणि लवलिना बोर्गोहेन यांनी आपल्या वजन गटातून उपांत्यफेरी गाठली आहे. महिलांच्या 50 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताची विद्यमान विजेती निखत झरीनने थायलंडच्या सी. रक्सतचा 5-2 अशा गुणफरकाने पराभव करून उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. महिलांच्या 75 किलो वजन गटात भारताच्या लवलिना बोर्गोहेनने मोझाम्बिकच्या ऍडोसिनेडा ग्रेमेनीचा 5-0 असा एकतर्फी फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. तत्पूर्वी 48 किलो गटात भारताच्या नितू घनगास आणि 81 किलो गटात स्वाती बोरा यांनी उपांत्यफेरी गाठून भारताची दोन पदके निश्चित केली होती. या स्पर्धेत 52 किलो गटात साक्षी चौधरी, 57 किलो गटात मनीषा मौन, 60 किलो गटात जस्मीन लंबोरिया आणि 81 किलोवरील गटात नुपूर शेरॉन यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत प्रतिस्पर्ध्यांकडून हार पत्करावी लागली. गेल्या खेपेला झालेल्या महिलांच्या विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धेत मनीषा मौनने कांस्यपदक मिळविले होते तर जस्मीन लंबोरियाने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक घेतले होते. 52 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या वू हिने साक्षी चौधरीचा 5-0, 57 किलो गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत फ्रान्सच्या अमिना झिदानीने भारताच्या मनीषा मौनचा 4-1, 60 किलो गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कोलंबियाचा व्हॅलेडेजने भारताच्या जस्मीन लंबोरियाचा 5-0 तर 81 किलोवरील गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कझाकस्तानच्या लेझाथने नुपूर शेरॉनचा 4-3 असा पराभव करत उपांत्यफेरी गाठली.