पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षां लचा प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण आणि भरतीप्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या विचारात घेता आता विविध परीक्षेसाठी घेतली जाणारी पूर्व परीक्षेची संख्या कमी करण्यात आली आहे. आता दोनच संयुक्त पूर्व परीक्षा ठेवण्यात आली आहे.
आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या विद्यमान भरतीप्रक्रियेमुळे परीक्षांची संख्या वाढलेली आहे. त्याचा परिणाम प्रशासकीय यंत्रणेवर पडत आहे. त्यामुळे भरतीप्रक्रियेस विलंब होत आहे. तसेच गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे प्रयत्न करावे लागत आहे. त्यावर उपाययोजना करण्याच्या उद्देशाने व भविष्यातील भरतीप्रक्रियेचे नियोजनाचा विचार करून विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीत सुधारणा करण्यात आली असल्याचे आयोगाने आज स्पष्ट केले आहे. हे सर्व बदल 2023 पासून आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येणार आहे.
राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट “अ’, “ब’ संवर्गातील पदभरतीसाठी “महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा’ या नावाने संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांकडून अर्ज घेताना सर्व संवर्गासाठी अर्हतेवर आधारित संवर्गाचा विकल्प घेण्यात येईल. त्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित केली जाईल व प्रत्येक संवर्गासाठी पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे सर्व अराजपत्रित गट “ब’, “क’ संवर्गासाठी “महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’ या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. त्या आधारे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व अराजपत्रित गट “ब’, “क’ संवर्गासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गातील निवडीसाठी शारीरिक चाचणी 70 गुणांची अर्हता असेल. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम संवर्गांच्या भरतीप्रक्रियेमध्ये कोणताही बदल नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
- सर्व राजपत्रित गट “अ’, “ब’: राज्य सेवा, कृषी, वनसेवा, इंजिनिअरिंग. मुख्य परीक्षा लेखी होणार
- सर्व अराजपत्रित गट “ब’, “क’ : पूर्वीची संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरुपात
- पीएसआय शारीरिक चाचणीसाठी 70 गुणांची अर्हता
हेही वाचा : ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरीचा खात्मा, काबुलमध्ये अमेरिकन सैन्याचं ऑपरेशन