सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत न थांबता काम युद्धपातळीवर सुरु : साहित्य नेण्यासाठी फेरीबोटची मदत

प्रतिनिधी /शिरोडा
सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत न थांबत शिद्दोटे खाजन शेतीशी संबंधीत साधारण दीडशे शेतकऱयांनी शेतीच्या बांधाला पडलेले भगदाड बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले आहे. त्यासाठी मंगळवारी संपूर्ण दिवस हे शेतकरी या कामात गुंतले होते. तळपणे शिरोडा येथील या खाजन शेतीच्या बांधाला शुक्रवारी भलेमोठे भगदाड पडून पेरणी केलेल्या संपूर्ण शेतीत जुवारी नदीचे खारेपाणी घुसले आहे.
शिरोडा भागात सर्वाधिक भातशेतीची लागवड होणारी शिद्दोटे ही सर्वांत मोठी व सुपिक शेतजमिन आहे. शिद्दोटे खाजन शेतीमध्ये तळपणे, सक्रे, आक्सण, शिरवाडा, तारीवाडा, बाजार शिरोडा व आसपासच्या भागातील साधारण साडेचारशेहून अधिक शेतकरी भातशेतीची लागवड करतात. येथील बहुतेक शेतकऱयांनी मशागत करुन नुकतीच पेरणी केली होती, तर काही शेतकऱयांनी पेरणीचे काम हाती घेतले होते. मात्र शेतीच्या बंधाऱयाला भले मोठे भगदाड पडल्याने संपूर्ण शेती पाण्याखाली जाऊन शेतकऱयांचे श्रम व पैसा वाया गेला आहे. शेतीवर कोसळलेल्या या आपत्तीपुढे हार न मानता साधारण दीडशे शेतकऱयांनी मंगळवारपासून बांधाला पडलेले भगदाड बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. साधारणे साडेचारशे शेतकरी याठिकाणी भातशेतीचे पिक घेत आहेत. भगदाड बुजविण्यासाठी येणारा खर्च शेतकऱयांनी स्वतः व गावातील काही हितचिंतकांकडून गोळा केला आहे.
शिद्दोटे शेतीपर्यंत माती व अन्य साहित्य नेण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने शेतकऱयांनी राय-राशॉल फेरीबोटीची मदत घेतली. सुरुवातीला फेरीबोट कर्मचाऱयांनी त्यासाठी रितसर लेखी परवानगी आणा असा पवित्रा घेतला. त्यावर शेतकरी आक्रमक झाले. गावातून सुरु असलेल्या फेरीबोट सेवेचा स्थानिकांना अडचणीच्यावेळी साहाय्य मिळत नसल्यास ही सेवाच बंद पाडू असा पवित्रा शेतकऱयांनी घेतला. त्यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला. मात्र त्यानंतर फेरीबोट कर्मचारी साहित्य नेण्यास तयार झाले.
जुवारी नदीला सुकती असताना बांधाचे काम हाती घ्यावे लागते. तर साहित्य तेथपर्यंत पोचविण्यासाठी भरती असणे आवश्यक आहे. या परिस्थितीचा सामना करीत शेतकऱयांनी भगदाड पडलेल्या बांधापर्यंत साहित्य पोचविले असून कामही जोरात सुरु केले आहे. दरम्यान या घटनेचे वृत्त दै. तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर फोंडा मामलेदार कार्यालयाचे अव्वल कारकून रमाकांत नाईक व स्थानिक तलाठय़ाने घटनास्थळी भेट देऊन भगदाड पडलेल्या बांधाची पाहणी केली. संबंधीत खात्याला तसा लेखी अहवाल पाठविल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी माजी पंचसदस्य मानुएल फर्नांडिस, स्थानिक पंच साल्वासांव फर्नांडिस, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर नाईक, सचिव मिलिंद मामलेकर व इतर शेतकरी उपस्थित होते.