सुधाकर काशीद,कोल्हापूर
Rangana Fort News : किल्ले पाहिले पाहिजेत.एवढ्या जंगलात दगड धोंड्यात एका टोकाला हे गड किल्ले का आहेत याचे वेगळेपण अनुभवले पाहिजे.कधी ठेचकाळत,कधी घसरत, कधी स्वत:ला सावरत त्याच्यावर पाऊल टाकले पाहिजे.पण गड किल्ला पाहायचा झाला तर तो सहलीचा इव्हेंट झाला नसला पाहिजे.त्यासाठी गड ,किल्ले , इतिहासप्रेमींनी चंग बांधला आहे.आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणा किल्ल्याकडे जाण्यासाठी होणाऱ्या नियोजित डांबरी रस्त्यास विरोध केला आहे. जेथे खरोखर गरज आहे अशा वाड्या वस्त्यावर पहिल्यांदा रस्ते करा.पण गड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यांना नैसर्गिक अवस्थेतच ठेवावे अशी त्यांची भूमिका आहे.
भुदरगड तालुक्याच्या टोकास पाटगावपासून पुढे काही अंतरावर रांगणा किल्ला आहे.हा किल्ला शिवरायांच्या इतिहासाचा साक्षीदार तर आहेच,पण गड किल्ल्याच्या बांधणीचा किंवा त्याच्या रचना तंत्राचा एक वेगळा नमुना आहे.साधारण बहुतेक किल्ल्यावर गडावर जायचे असेल तर गड चढावा लागतो.पण रांगणा किल्ला फारसा चढावा लागत नाही.पाटगाव ,तांब्याची वाडी,भटवाडी,चिकेवाडी या मार्गाने चालत गेलं की गडाच्या पायरीपर्यंत पोहोचता येते.व गडावरच थेट आपले पाऊल पडते.गडाच्या तिन्ही बाजूंनी खोल दऱ्या आहेत.व त्यात थेट कोकणाला जाऊन भिडल्या आहेत.
रांगणा किल्ला हा रस्त्याच्या दृष्टीने किंवा दळणवळणाच्या दृष्टीने थोडा आडमार्गाचा किल्ला आहे.भटवाडीपासून साधारण दहा ते अकरा किलोमीटरचा प्रवास फक्त दाट जंगलातूनच आहे.दोन ठिकाणी खळाळत वाहणारे मोठे झरे आहेत.वाघ,बिबटे,काळा बिबट्या,रान कुत्री,गवे ,अस्वल ,भेकर यास वेगवेगळ्या जातीचे वन्यप्राणी व सरपटणारे प्राणीही आहेत.या परिसरात आढळणाऱ्या एका दुर्मिळ पालीला निमॅस्टिक रांगणा न्सिस असे नाव दिले गेले आहे.खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वेळ हा किल्ला सोडवून घेतला आहे.महाराणी ताराराणी यांच्या वास्तव्याचे सुरक्षित ठिकाण म्हणून या किल्ल्याचे ऐतिहासिक वेगळेपण आहे.किल्ल्यावर मंदिर आहे दीपमाळा,तलाव आहेत.तिन्ही बाजूंनी कोकणाला जाऊन भिडलेली नैसर्गिक तटबंदी आहे.कोकणात पायी उतरण्याचा एक पारंपारिक मार्गही आहे.रांगण्याचा पाऊस म्हणजे निसर्गाचा अनोखा नजराना आहे.तिथे तिन बाजूच्या दऱ्यातून पावसाचे ढग उसळून वरती येतात.पावसाळ्यात एक फूट अंतरावरचेही दिसतच नाहीत.इतक्या पावसाच्या सरी व धुक्याचे ढग असतात.एकदा पाऊस सुरू झाला की रांगण्याकडे येण्या-जाण्याची वाट तीन-चार महिन्यासाठी बंद होते.हा किल्ला पहाणे हा जसा एक अनुभव आहे, तसा या किल्ल्याकडे जाणारा सध्याचा रस्ता हा देखील एक निसर्ग विविधतेचा अनुभव आहे.दाट जंगलातून अर्धा किलोमीटरचा होणारा इथला निसरडा प्रवास गड किल्ल्याचे जंगलाचे महत्व घट्ट करण्यास खूप मोलाचा आहे.
रांगणा किल्ल्याच्या अलीकडे चिकेवाडी हे 16 घराचे छोटे गाव आहे.हे शेवटचेच गाव.या गावासाठी हा रस्ता केला जाणार हे कारण पुढे केले गेले आहे. वास्तविक चिकेवाडी या फक्त 16 घरांचे जंगलात वसलेल्या गावाचे भटवाडीजवळ सर्व सोयीसह पुनर्वसन करण्याची योजना आहे.या 16 घरातील 21 जणांना पुनर्वसनासाठी तयार होण्यास तत्कालीन प्रांताधिकारी फुलारी यांनी खूप प्रयत्न केले होते.पण देव आम्हाला कौल देत नाही असे भावनिक कारण सांगून 21 गावकरी पुनर्वसनाला तयार नाहीत.ते बारा किलोमीटरची रोज पायपीट करून भटवाडीला येतात-जातात. दिवस मावळला तर ते भटवाडीतच थांबतात. रात्री पायी जाणे पूर्णपणे टाळतात. या लोकांसाठी रस्ता हे कारण काढून डांबरी रस्ता केला जाणार असे सांगितले जात आहे.पण प्रत्यक्षात डांबरी रस्ता झाल्यास भटवाडी ते रांगणा या जंगली रस्त्याचे अस्तित्वच संपणार आहे.आता वर्षाला दोन तीन हजार खरे इतिहास प्रेमी किल्ल्याच्या ओढीने रांगण्यावर कसरत करत येतात.डांबरी रस्ता झाला की रोज रांगण्याला जत्राच फुलेल अशी परिस्थिती आहे.आणि म्हणूनच निसर्गप्रेमीनी या डांबरी रस्त्याला विरोध केला आहे.
माजी खासदार संभाजी राजे छत्रपती, शिवदुर्ग आंदोलन समिती, राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद ,हर्षल सुर्वे, इंद्रजीत सावंत,दुर्ग अभ्यासक भगवान चिले, राम यादव ,देवेंद्र भोसले, रवी कदम , अमित अडसुळे, रवी आमने, धनराज जाधव यांनी रांगणा किल्ल्याकडे जाण्यासाठी डांबरी रस्ता होऊ नये म्हणून वन विभाग ,पुरातत्त्व विभागाच्या केंद्रीय स्तरावर दाद मागितली आहे.
Previous Article‘ऑडिट’ न केल्यास निधी मिळणार नाही
Next Article जीसुडा कारभार विश्वजितच्या रडारवर
Related Posts
Add A Comment