लोकसभा अध्यक्षांना दाखवले काळे कापड :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेतून राहुल गांधी यांना अपात्र ठरवल्याच्या विरोधात काँग्रेससह इतर अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनी सोमवारी ‘ब्लॅक डे’ पाळला. विरोधी पक्षाचे बहुतांश सदस्य सोमवारी काळे कपडे परिधान करून संसद अधिवेशनासाठी दाखल झाले होते. यावेळी काँग्रेस आणि इतर काही मित्रपक्षांच्या खासदारांनी काळे कपडे परिधान करून राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध केला. विरोधी पक्षनेत्यांनी सुऊवातीला संसदेच्या संकुलात ठिय्या मांडला आणि नंतर विजय चौकापर्यंत मोर्चा काढला.
राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याचे प्रकरण आणि अदानी प्रकरणावर सोमवारी विरोधकांनी अनोख्या मार्गाने लक्ष वेधले. बहुतांश विरोधी खासदारांनी काळे कपडे परिधान केले होते. विरोधी खासदारांनी लोकसभेत प्रचंड गदारोळ केला. एका खासदाराने तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या आसनापर्यंत पोहोचून काळे कापड हलवायला सुऊवात केली. विरोधकांचा हा गदारोळ पाहून सभाध्यक्षांनी सभागृह तहकूब केले. प्रत्यक्षात सकाळी 11 वाजल्यापासूनच दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाले. विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केल्यामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तर लोकसभेचे कामकाज 4 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजता सुरू झाले, मात्र गदारोळामुळे ते दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन
संसदेच्या आवारात निदर्शने केल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे अनेक खासदार, द्रमुकचे केटीआर बाळू, आरसीपीचे नेते उपस्थित होते. त्यांनी ‘सत्यमेव जयते’ असे लिहिलेला एक मोठा बॅनर हातात पकडला होता. यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. तृणमूल काँग्रेसचे खासदार प्रसून बॅनर्जी हेही विरोधी मोर्चात सहभागी झाले होते. 18 विरोधी पक्षांच्या बैठकीतही ते सहभागी झाले होते. प्रदीर्घ काळानंतर काँग्रेसने बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या कोणत्याही बैठकीत आणि निदर्शनात तृणमूल काँग्रेस सहभागी झाला नव्हता.
विरोधकांच्या बैठकीत ‘तृणमूल’चीही हजेरी
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांची आपल्या दालनात बैठक घेतली. यात काँग्रेस, द्रमुक, सपा, जेडीयू, बीआरएस, सीपीएम, आरजेडी, एनसीपी, सीपीआय, आप आणि टीएमसीसह 17 पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीला तृणमूल काँग्रेसची उपस्थिती आश्चर्यकारक होती. या अधिवेशनात तृणमूल काँग्रेस आतापर्यंत कोणत्याही आंदोलनात एकत्र आलेले नाही. लोकशाहीच्या रक्षणासाठी जो पुढे येईल त्याचे आम्ही स्वागत करू, असे खर्गे यांनी बैठकीपूर्वीच स्पष्ट केले होते.