प्रतिनिधी/ बेळगाव
रिकामे झाले घर…
रिकामे झाले मखर…
पुढच्या वषी पुन्हा घरी येण्याच्या थाटामाटात….
निघाला माझा लंबोदर….
अशा मनोभावाने निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. दहा दिवस भक्तिभावाने गणरायांची पूजा केली. आपल्या घरातील व्यक्तीप्रमाणेच त्यांची सेवा केली. मात्र, विसर्जनाचा दिवस जवळ येताना भाविक कासावीस होत होते. शेवटी शुक्रवारी तो दिवस आलाच आणि बेळगाकरांचा कंठ दाटून आला. मोठय़ा भक्तिभावाने सेवा करून अखेर गणरायाला भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बेळगाव शहरात मुंबई-पुण्यानंतर सर्वात मोठा गणेशोत्सव साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी बेळगावमध्ये गणेशोत्सव सुरू केल्यापासून आजतागायत पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढून गणरायाला निरोप दिला जातो. गणेशोत्सवाला सार्वजनिक व विधायक स्वरुप मिळाल्यामुळेच लोकमान्यता मिळाली. बेळगाव शहर व उपनगरांमध्ये 380 हून अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत. शुक्रवारी या सर्व गणेशमूर्तींचे टप्प्याटप्प्याने विसर्जन करण्यात आले.

सायंकाळी 6 वाजता परंपरेप्रमाणे हुतात्मा चौकातील गणेशमूर्तीचे पूजन करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खूट, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमुकलानी चौक, पाटील गल्ली, शनिमंदिर चौक, कपिलेश्वर उड्डाणपूलमार्गे कपिलतीर्थ व कपिलेश्वर विसर्जन तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या दोन तलावांसोबतच खानापूर रोड येथील जक्कीनहोंड येथेही सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
शुक्रवारी सकाळपासून शहरातील विसर्जन तलावांसोबत महानगरपालिकेच्या कृत्रिम टाक्मयांमध्ये घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते. ढोल-ताशा, पारंपरिक वाद्ये व डीजेच्या तलावर घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात होते. निर्माल्य टाकण्यासाठी महानगरपालिकेने स्वतंत्र व्यवस्था केली होती. त्याचबरोबर विसर्जन तलावांमध्ये होणारा कचरा कर्मचाऱयांकडून स्वच्छ करण्यात येत होता. दुचाकी, चार चाकी, रिक्षा, ट्रक्टर यामधून घरगुती गणेशमूर्ती विसर्जन तलावांपर्यंत आणून त्यांचे विसर्जन केले जात होते.
विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर मोजक्मयाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ढोल-ताशा व ध्वजपथक घेऊन मूर्ती विसर्जनासाठी प्रस्थान केले. मात्र, मध्यंतरीच्या काळात ढिसाळ नियोजनामुळे रस्ते सुन सुने होते. यामुळे गणेशमूर्ती पाहण्यासाठी आलेल्या भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. विसर्जन मिरवणूक यंदे खूट येथे आली असताना त्यानंतरची गणेशमूर्ती थेट मारुती गल्लीच्या एका कोपऱयात होती. यामुळे दोन गणेशमूर्तींमधील विस्कळीतपणा जाणवला. मध्यरात्री 2 वाजेपर्यंत केवळ 10 ते 12 गणेशमूर्तीच विसर्जन मार्गातून मार्गक्रमण करत होत्या. त्यानंतर पावसाच्या हजेरीने विसर्जन मिरवणूक काही काळ थांबली.
पावसामुळे हिरमोड
शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता मानाच्या गणपतीपासून मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल 6 ते 7 तास केवळ 10 ते 12 गणेश मंडळांनीच आपला सहभाग मिरवणुकीत दर्शविला. मध्यरात्रीनंतर सुरू झालेली पावसाची रिपरिप, मिरवणुकीतील विस्कळीतपणा व गॅलरीची व्यवस्था नसल्यामुळे लहान मुले खांद्यावर घेऊन नागरिकांना पायपीट करावी लागत होती. पाऊस आला की मिळेल तेथे आसरा घेत मिरवणूक पाहण्याची वेळ आल्याने अनेकांचा हिरमोड झाला.
रात्री 3 वाजल्यानंतर काही मंडळांनी आपल्या गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढल्या. त्यानंतर डीजेच्या तालावर विसर्जन मिरवणूक सुरू होती. मारुती गल्ली व गणपत गल्ली या दोन गल्ल्यांमध्येच विसर्जन मिरवणूक अडकली होती. शनिवारी सकाळपर्यंत अनेक गणेशमूर्ती गल्लीतच होत्या. त्यानंतर दुपारपर्यंत हळूहळू या मूर्ती कपिलेश्वर तलावाकडे मार्गस्थ झाल्या. सायंकाळी उशिरापर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते.
विस्कळीतपणा आणि भक्तांचा हिरमोड
विसर्जन मिरवणुकीत आलेल्या विस्कळीतपणाचा भाविकांना फटका बसला. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी केवळ शहरी भागातूनच नाही तर खानापूर व चंदगडसह ग्रामीण भागातून भाविक उपस्थित होते. परंतु रात्री 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत मिरवणुकीत एकही गणेशमूर्ती हुतात्मा चौक परिसरात आली नसल्याने भाविकांचा हिरमोड झाला. पावसाची रिपरिप सुरू असतानाही गणेशमूर्ती पाहण्यासाठी भाविक दाखल झाले होते. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचा हिरमोड झाला. लहान मुले झोपी गेल्यामुळे मिरवणूक न पाहताच नागरिकांना घरी परतावे लागले.
डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई

यावषी प्रशासनाने डीजे लावण्यावर मर्यादा आणल्या होत्या. प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीत डीजे लावण्यात आला. मागील दोन वर्षांत विसर्जन मिरवणूक मोठय़ा प्रमाणात झाली नसल्याने यावषी हजारोंच्या संख्येने तरुणाई डीजेवर थिरकत होती. भर पावसातही बेभान होऊन नृत्य करताना तरुण दिसत होते. यावषी केवळ तरुणच नाही तर तरुणी व महिलांचीही संख्या लक्षणीय होती. पहाटेपर्यंत डीजेवर नृत्य सुरूच होते.
मारुती गल्लीने जपली पारंपरिकता
एकीकडे विसर्जन मिरवणुकीला आधुनिक स्वरुप प्राप्त होत आहे. परंतु मारुती गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाने पारंपरिकता जपली आहे. या मंडळाने पारंपरिक पद्धतीने पालखीतून आपली गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेली. मुंबई, पुणेप्रमाणे येथेही मागील काही वर्षांपासून मारुती गल्लीचे मंडळ ही परंपरा जपत आहे. यामुळे मिरवणुकीमध्ये पालखीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते.
मर्दानी खेळ आणि करेलाने वेधले लक्ष
बेळगावमध्ये होणाऱया गणेशोत्सव व शिवजयंती मिरवणुकीत मर्दानी खेळ, शिवकालीन युद्धकला व करेलाचे सादरीकरण होते. शुक्रवारीही काही मंडळांनी मर्दानी खेळ व करेलाचे सादरीकरण केले. मैदानी खेळांमधून शरीर तंदुरुस्त करावे हा या मागील उद्देश होता. मिरवणुकीत सहभागी झालेले अनेक तरुण करेला फिरविण्यासाठी सहभागी होत होते. यामुळे हे खेळ लक्षवेधी ठरले.
बिबटय़ाची ख्याती मिरवणुकीत गाजती
मागील महिनाभरापासून बेळगाव परिसरात एका बिबटय़ाने दहशत माजविली होती. गणेशोत्सवात काही मंडळांनी या बिबटय़ावर देखावे सादर केले. त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकीतही या बिबटय़ाचीच चर्चा होती. डीजेवरून पुकारताना बेळगावच्या बिबटय़ासाठी हात वर करा, असे सांगण्यात आले आणि त्यानंतर ‘मैं हू डॉन’ हे गाणे वाजवून अनेकांचा उत्साह वाढविण्यात आला. काही युवकांनी बिबटय़ाचे छायाचित्र असणारे टी-शर्ट परिधान केले होते. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीतही चर्चा बिबटय़ाचीच दिसून आली.
मंडळ कार्यकर्त्यांचा उत्साह
शहर आणि उपनगर परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात. मागील दोन वर्षात कोरोना महामारीमुळे नियमावलीच्या चौकटीत गणरायांना निरोप द्यावा लागला. पण यावषी सर्व निर्बंध मागे घेण्यात आल्याने सर्व मंडळांनी मोठय़ा उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला.तसेच विसर्जन मिरवणूकदेखील मोठय़ा दिमाखात काढण्यात आली. विसर्जन मिरवणूकीला सातत्य नव्हते, एकेक करीत सर्व मंडळाच्या गणेशमुर्ती विसर्जन तलावाकडे मार्गक्रमण करीत होत्या. बहुतांश मंडळाच्या मिरवणूकीमध्ये महिला, मुले कार्यकर्त्याचा उत्फुर्त सहभाग होता.
मिरवणूकीचे उद्घाटन होण्यापुर्वीचे भातकांडे गल्लीतील गणशोत्सव मंडळाने सकाळी 9 वाजता विसर्जन मिरवणूक काढून दुपारी गणपती बापांना निरोप दिला. रात्री आठ वाजेपर्यत कपिलेश्वर आणि कपिलतीर्थ या देन्ही ठिकाणी 9 गणेशमुर्ती चे विसर्जन झाले होते. विसर्जन सोहळया पाहण्यासाठी भाविकांनी मोठयाप्रमाणात गदीं केली होती. पेनच्या साहाय्याने गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यात येत होते. हा सोहळा पाहण्यासाठी तलावावर बाळगोपाळ,तरूण-तरूणी, महिला, वृध्दांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
गणेशमुर्ती विसर्जन सोहळयावेळी रात्री 1 वाजता वरूण राजाने हजेरी लावली. यावेळी पावसाच्या जोरदार सरीमुळे सोहळा पाहण्यासाठी तलावावर आलेल्या भाविकांना आसरा शोधावा लागला. अडीच वाजेपर्यत पावसाचा शिडकावा सुरूच होता. तरीदेखील विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आलेल्या भाविकांची गर्दी कायम होती. विसर्जनावेळी गणेशमुर्ती विसर्जन करताना निर्माण होणाऱया अडचणीचे निवारण करण्यासाठी गणेशमुर्तीकार असोसिएशनचे पदाधिकारी व समस्य उपस्थित होते. विसर्जन करण्यासाठी भाविकांचीगर्दी कायम होते. विविध मंडळाच्या गणरायांची विसर्जन मिरवणूक मोठया उत्साहाने आणि शांततेत काढून बाप्पांना निरोप देण्यात आला.