मुदत वाढवून हवी असल्यास लेखी माहिती द्यावी
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र विद्यमान गाळेधारकांचे भाडे थकीत राहिल्यास लिलाव प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. तसेच गाळय़ांच्या भाडेकराराची मुदत वाढवून हवी असल्यास लिलाव प्रक्रियेपूर्वी त्याबाबत लेखी स्वरुपात माहिती द्यावी, अन्यथा गाळय़ासाठी प्राधान्य मिळणार नाही, अशी सूचनेची नोटीस बजाविण्यात आली
आहे.
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील 268 गाळय़ांच्या भाडेकराराची मुदत संपली आहे. हे गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिकेने दि. 6 ते 18 मे या दरम्यान लिलाव प्रक्रिया आयोजित केली आहे. या दरम्यान विविध ठिकाणांचे गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी बोली आयोजित करण्यात आली आहे. यापैकी काही गाळे बारा वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. पुन्हा बारा वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यासाठी ही लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र यापूर्वीच्या भाडेकरूंच्या भाडय़ाची रक्कम थकबाकी असल्यास लिलाव प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. त्यामुळे लिलाव प्रक्रियेपूर्वी थकीत रक्कम भरणा करावी, अशी नोटीस महसूल विभागाच्यावतीने गाळेधारकांना बजाविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सध्या भाडेकरू असलेल्या गाळेधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. पण त्याकरिता लेखी अर्ज देण्याची सूचना यापूर्वी केली होती. मात्र काही मोजक्मयाच गाळेधारकांनी लेखी अर्ज दिले आहेत.
मुदतीसाठी 5 टक्के जादा भाडे
भाडेकराराची मुदत वाढवून हवी असल्यास लिलावापूर्वी लेखी स्वरुपात अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. भाडेकराराची मुदत वाढवून देण्यासाठी लिलाव प्रक्रियेवेळी लावण्यात येणाऱया बोलीवर 5 टक्के जास्त भाडे आकारले जाणार आहे. अशा विविध सूचनांची नोटीस भाडेकरूंना महापालिकेच्यावतीने बजाविण्यात आली आहे. भाडेकराराची मुदत वाढविण्यासाठी अर्ज दिला नसल्यास प्राधान्य दिले जाणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.