विदेशमंत्री बिलावल यांची कबुली : पाकिस्तान जगात पडला एकाकी
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानचे विदेशमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारतासोबत चांगले संबंध असावेत, अशी भूमिका मांडली आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडला आहे. अनेक देशांसोबत आमचे उत्साहजनक संबंध नाहीत. भारतासोबतचे संबंध तोडल्याने पाकिस्तानचे हित साधले जातेय का? असे प्रश्नार्थक विधान त्यांनी केले आहे.
पाकिस्तानातील शाहबाज शरीफ सरकार आगामी दिवसांमध्ये भारताच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे करू शकते, असे मानले जात आहे. दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी होऊ शकत नसल्याचे भारताने अनेकवेळा स्पष्ट केले आहे. पाकिस्तानला चर्चा करायची असल्यास त्याला बिनशर्त दहशतवादाचे समर्थन बंद करावे लागणार असल्याची भारताची भूमिका आहे. स्वतःच्या देशाचा प्रतिनिधी म्हणून मी भारत सरकारशी संपर्क साधू शकत नाही तसेच भारतीय लोकांशी बोलू शकत नसल्याचे बिलावल म्हणाले.
ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार झाल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ठप्प आहेत. भारताच्या या पावलाच्या विरोधात पाकिस्तानने एकतर्फी पद्धतीने द्विपक्षीय व्यापार रोखण्याची घोषणा केली होती. एवढेच नाही तर पाकिस्तानने प्रत्येक जागतिक व्यासपीठावर भारताच्या विरोधात वातावरण निर्मितीचा अयशस्वी प्रयत्न केला होता. पाकिस्तान संयुक्त राष्ट्रसंघ, इस्लामिक देशांची संघटना आणि सार्कच्या व्यासपीठावर तोंडघशी पडला होता.
पडद्याआडून चर्चेचा दावा
फेब्रुवारी 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी करण्यावर सहमती दर्शविली होती. तेव्हा दोन्ही देशांचे संबंध सुधारण्याची अपेक्षा बळावली होती. शस्त्रसंधी अद्याप सुरू असली तरीही दोन्ही देश पुन्हा चर्चा सुरू करण्यावर सहमत झालेले नाहीत. परंतु पाकिस्तानात आता सत्तांतर झाल्याने काही प्रमाणात संबंध सुधारण्याची अपेक्षा वाढली आहे. भारत व पाकिस्तान पडद्याआडून चर्चा करत असल्याचाही दावा करण्यात येतो.