वृत्तसंस्था/ चेन्नई
ओ. पन्नीरसेल्वम यांच्यासोबत पक्षात राहणे कुठल्याही स्थितीत शक्य नाही. अण्णाद्रुमकचे समन्वयक ओ. पन्नीरसेल्वम हे द्रमुक सरकारची बाजू घेत आहेत. सत्तारुढ पक्षाचे कौतुक ओपीएस यांनी केल्यास पक्षात फुटीची स्थिती कायम राहणार असल्याचे उद्गार अण्णाद्रमुकचे नेते के.पी. मुनुसामी यांनी काढले आहेत.
पक्षाचे खजिनदार ओ. पन्नीरसेल्वम यांनी सत्तारुढ द्रमुकला साथ दिल्याने त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करणे शक्य नसल्याचे मुनुसामी म्हणाले. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या आवाहनानंतर पन्नीरसेल्वम यांनी श्रीलंकेला मदत करण्यासाठी वैयक्तिक स्वरुपात 50 लाख रुपयांचे योगदान करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
स्वार्थी असल्याचा आरोप
पन्नीरसेल्वम यांच्याकडून श्रीलंकेच्या मदतीसाठी वैयक्तिक स्वरुपात 50 लाख रुपयांचे योगदान करण्याचा प्रस्ताव एक स्वार्थी पाऊल आहे. अण्णाद्रमुकचे सर्वोच्च नेते एडप्पादी के. पलानिसामी यांच्याकडून याप्रकरणी सल्ला घेण्यात आलेला नाही. याचमुळे अशा नेत्यासोबत वाटचाल करणे शक्य नसल्याचे मुनुसामी यांनी म्हटले आहे.
अण्णाद्रमुकमध्ये कलह
मागील महिन्यापासून अण्णाद्रमुकमध्ये एकल-नेतृत्वाच्या मुद्दय़ावरून तीव्र कलह दिसून येत आहे. पक्षात पलानीसामी यांना मोठय़ा प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. तर पन्नीरसेल्वम हे पक्षात एकाकी पडले आहेत. याचमुळे अण्णाद्रमुक लवकरच पन्नीरसेल्वम यांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचे मानले जात आहे. अण्णाद्रमुकच्या बैठकीचे आयोजन करण्याचा मुद्दा सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. या बैठकीला पन्नीरसेल्वम यांचा विरोध आहे. या बैठकीत ई. पलानिसामी हे पक्षाचे प्रमुख म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे.