प्रतिनिधी/ बेळगाव
समादेवी गल्ली येथील समादेवी उत्सव कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी सायंकाळी देवीची पालखी प्रदक्षिणा झाली. समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, नार्वेकर गल्ली, श्री समादेवी मंदिर या परिसरातून प्रदक्षिणा करून पुन्हा पालखी देवळात आली. तत्पूर्वी सकाळी चौघडा व काकडारती झाली. सकाळी 7 वाजता श्रीला महाअभिषेक झाला. दुपारी 12 वाजता महानैवेद्य झाला.
पालखीसोबत ढोल-ताशा पथक होते. त्यांच्या निनादाने वातावरण मंगलमय बनले. प्रदक्षिणा मार्गावरील घरांसमोर रांगोळी रेखाटण्यात आली होती. या उत्सवानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शनिवारी सकाळी 6.30 ते 11 दरम्यान नवचंडी होम झाला. दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसाद झाला. महाप्रसादाला हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून लाभ घेतला. उत्सव यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष दत्ता कणबर्गी, मंदिर पदाधिकारी, समादेवी संस्थान व वैश्यवाणी समाजातील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.