परिवहन कर्मचारी 21 पासून संपावर
प्रतिनिधी/ बेंगळूर
विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने 21 मार्चपासून राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे गुढीपाडव्यावेळी प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
21 मार्च रोजी सकाळी 6 पासून संपाला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनंत सुब्बाराव यांनी दिली आहे. 1 लाखहून अधिक परिवहन कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार असून 23 हजारपेक्षा जास्त बसेस स्थगित होतील. कर्मचारी पुढील मंगळवारपासून कोणत्याही कारणास्तव बसेस आगारातून बाहेर काढणार नाहीत, असेही सुब्बाराव यांनी सांगितले आहे.
मूळ वेतनात 25 टक्क्यांनी वाढ करावी, भत्त्यात 5 टक्के वाढ करणे, एप्रिल 2011 मध्ये बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांची फेरनियुक्ती करावी, कर्मचाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत, संपाच्या वेळी बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ जारी पुन्हा नियुक्त करावे, अशा मागण्या परिवहन कर्मचारी संघटनेने केल्या आहेत.