पारपत्र कार्यालयातील गर्दीवर उपाय
प्रतिनिधी /पणजी
विदेशात जाण्यासाठी पासपोर्ट बंधनकारक असला तरी आतापर्यंत तो केवळ पारपत्र कार्यालयाच्या माध्यमातूनच करावा लागत होता. त्यामुळे या कार्यालयात लोकांची बरीच गर्दी व्हायची. तसेच विविध प्रक्रियांमुळे पासपोर्ट मिळण्यात बराच अवधीही लागत असे. या सर्वांची दखल घेत लोकांच्या सोयीसाठी पोस्टाच्या कार्यालयातूनही पासर्पोट मिळवून देण्याची सेवा प्रारंभ करण्यात आली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून पासर्पोटसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तरीही सर्वसामान्य नागरिकांना त्यातील माहिती भरण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे एखाद्या एजंटचा आधार घेतल्याशिवाय हे काम होत नव्हते. त्यानंतर पारपत्र कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखतवजा प्रक्रिया, पोलीस चौकशी आणि अन्य प्रक्रिया पार पडल्यानंतर पासपोर्ट प्रत्यक्ष हाती पडण्यासाठी पोस्टमनची वाट पाहत थांबणे, यात बराच वेळ जात होता.
आता पोस्टातूनच पासपोर्ट बनवून देण्याची सोय उपलब्ध करण्यात आल्यामुळे लोकांना अधिक चांगली सुविधा मिळणार आहे. पासपोर्टसाठी ऑनलाईन नोंदणी करून अर्ज करता येतो. त्यासाठी पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करून आवश्यक फी भरावी लागेल. ही फी सुमारे 1300 रुपये एवढी असते. त्यानंतर मुलाखतीसाठी संकेतस्थळावरून तारीख निर्धारित करण्यात येते. त्या दिवशी सर्व कागदपत्रे घेऊन पोस्ट कार्यालयात जावे लागेल. त्यावेळी सर्व कागदपत्रांची छाननी करण्यात येते. तसेच अर्जदाराच्या हाताच्या बोटांचे ठसे, डोळे यांचे स्पॅनिंग करण्यात येते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुमारे 15 दिवसांच्या कालावधीनंतर पासपोर्ट हाती पडतो.
पासपोर्टसाठी जन्म दाखला, शैक्षणिक गुणपत्रिका, आधारकार्ड, निवडणूक कार्ड, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना, रेशनकार्ड आणि नोटरीकृत प्रतिज्ञापत्र एवढी कागदपत्रे आवश्यक असतात.
पोस्ट कार्यालयात वाढता प्रतिसाद
पणजीत पूर्वीपासूनच पारपत्र कार्यालय असल्यामुळे दक्षिण गोव्यातील लोकांसाठी मडगाव येथे पोस्ट कार्यालयात पासपोर्टसाठी दालन खोलण्यात आले आहे. सध्या त्याला लोकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून रोज किमान 30 अर्ज दाखल होतात. फी भरण्यापासूनची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे लोकांना पासपोर्ट शक्य तेवढय़ा लवकर मिळण्यास मदत होते. पासपोर्टइंडिया डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरून ही सेवा मिळविता येते.
तत्काळ पासपोर्ट मिळविणेही शक्य
दरम्यान, अनेकदा काही लोकांना एखाद्या कामासाठी तातडीने विदेशात जावे लागते. मात्र त्यांच्याकडे पासपोर्ट नसतो. त्यामुळे त्यांची गोची होत असते. या समस्येवर उपाय म्हणून तत्काळ पासपोर्ट सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी अधिक फी आकारण्यात येते व ती पोस्ट कार्यालयात रोख भरावी लागते. अर्ज केल्यानंतर जास्तीत जास्त दोन दिवसांच्या आत पासपोर्ट उपलब्ध करण्यात येतो.
विदेश व्यवहार मंत्रालयातर्फे सुमारे 12 वर्षांपूर्वी ही सेवा देशभरात सुरू करण्यात आली होती. त्याअंतर्गत आतापर्यंत 500 पेक्षा जास्त पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.