ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भीमा कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांची जीभ घसरली. पाटलांच्या पोरांना लग्नाआधी पोरं असतात आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे, असं वादग्रस्त वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.
पाटील म्हणाले, महाडिक आमच्या पोरांना बाळ म्हणतोय, अरे आम्ही पाटील आहोत, पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी बाळं असतात, तसेच आमच्या पोरांना वयाच्या 17 व्या वर्षीच 302, 307 ची कलमं लागली आहेत, याचा आम्हाला अभिमान असल्याचे सांगत पाटील यांनी एक प्रकारे मुलांच्या गुन्हेगारीचं समर्थन केलं.
अधिक वाचा : ब्लू टिकच्या पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय ट्विटरकडून रद्द
भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रविवारी होणार आहे. मागील 10 वर्षांपासून हा कारखाना कोल्हापूरचे भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या ताब्यात आहे. त्यांच्या विरोधात राजन पाटील निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान, राजन पाटील यांच्या या वक्तव्यावर महाडिक म्हणाले, राजन पाटील यांच्या वक्तव्याचे त्यांच्या मुला-मुलींच्या सासुरवाडीच्या पाहुण्यांना काय वाटत असेल? त्यांच्या या वक्तव्यामुळे मुली दिलेल्या बापाला झोप लागली असेल का? सुनांना काय वाटले असेल? पाटलांचे हे वक्तव्य राज्यातील महिला आणि पाटील मंडळींचा अवमान करणारे आहे. राज्यातील पाटलांनी त्याचा निषेध करायला हवा, असेही महाडिक म्हणाले.