शिवमोग्गा : ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या कर्नाटक शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी- २०२२) बसलेल्या उमेदवाराच्या परीक्षेच्या हॉल तिकिटावर बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीचा फोटो छापण्यात आल्याने कर्नाटकात खळबळ माजली आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून प्रवेशपत्राचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाने ही घटना उघडकीस आणली आहे. रुद्रप्पा कॉलेजमध्ये एका उमेदवाराने सनी लियोनीचा फोटो असलेले हॉल तिकीट काढले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. संस्थेच्या प्राचार्यांनी सायबर क्राइम पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन अर्ज भरतेवेळी छायाचित्र अपलोड करताना हा गोंधळ झाला असावा असा अंदाज व्यक्त केला. पण फॉर्म ऑनलाइन भरला नसल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. “या प्रकरणावर प्रसारमाध्यमे जे काही प्रसारित करत आहेत त्यात विभागाची कोणतीही चूक नाही. तरीही आम्ही पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करून या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.” असे सार्वजनिक सूचना विभागाने स्पष्टीकरणात म्हटले आहे.