सरकारला कोटय़वधींचा चुना, देशभरात जाळे : चिकोडी पोलिसांची दिल्लीला धडक : आणखी दोघा जणांचा शोध जारी

प्रतिनिधी /बेळगाव
चार दिवसांपूर्वी चिकोडी पोलिसांनी सात जणांच्या आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीला अटक करून बनावट पानमसाला तयार करणाऱया मोठय़ा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. केवळ गुटखा आणि पानमसालाच नव्हे तर ही टोळी नामवंत कंपन्यांची बनावट औषधेही बनवत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याचाच हा प्रकार आहे. या क्राईम सिंडिकेटचे जाळे देशभरात विस्तारले आहे.

जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी या वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक बसवराज यलीगार, पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी या सिंडिकेटची पाळेमुळे खणली आहेत. देशाची राजधानी नवी दिल्लीपर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले आहेत.
सध्या आरएमडी व विमल पानमसाल्याचे बनावट उत्पादन करताना सात जणांना अटक झाली आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, नवी दिल्ली, बेंगळूर येथील गुन्हेगारांची धरपकड झाली आहे. या प्रकरणातील आणखी दोघा जणांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांना अटक झाल्यावर बनावट औषधे निर्मितीवर आणखी प्रकाश पडणार आहे.
पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील व त्यांचे सहकारी या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खोदण्यात यशस्वी झाले आहेत. एकसंबा येथील राजलक्ष्मी किराणा दुकानात बनावट आरएमडी विकताना 17 मे 2022 रोजी चिकोडी येथील मुज्जम्मिल मुल्ला या तरुणाला अटक झाली. त्याच्या चौकशीतून एक-एक टप्पे पार करीत चिकोडी पोलिसांनी दिल्ली गाठली.
हैदराबादच्या डिलरच्या अटकेनंतर उलगडा
बनावट पानमसाला बेळगाव येथून पुरवला जात होता. बेळगाव येथील लिंक शोधल्यानंतर हैदराबाद कनेक्शनचा उलगडा झाला. बेळगावच्या डिलरने ही उत्पादने आपल्याला हैदराबादहून येतात, अशी कबुली दिली. हैदराबादच्या डिलरच्या अटकेनंतर बेंगळूर येथे या बनावट उत्पादनांचा कारखाना सुरू आहे, याची वाच्यता झाली. पोलिसांनी बेंगळूरच्या कारखान्यावर छापा टाकून कच्चा माल व यंत्रोपकरणे जप्त केली.
पानमसाला बनवताना केमिकलचा वापर
पानमसाला बनवताना परमिटेड सिंथेटिक्सचा वापर केला जातो. या सिंडिकेटच्या कारखान्यात मात्र केमिकलचा वापर होत होता. पोलिसांनी केमिकल ताब्यात घेतले आहे. वैज्ञानिक पृथ्थकरणासाठी ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच ही केमिकल व या केमिकलपासून बनविलेला पानमसाला मानवी जीवनाला किती अपायकारक आहे, हे स्पष्ट होणार आहे.
वेगवेगळय़ा कंपन्यांचा पानमसाला बेंगळूरला बनविण्यात येत होता. पानमसाल्याचे पाऊच बनविण्यासाठी लागणाऱया प्लास्टिकचे लॅमिनेशन रोल कुठून मागवत होते, याचा माग काढला असता त्याचे धागेदोरे देशाची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचले. नामवंत कंपन्यांच्या नावे बनावट उत्पादने तयार करण्यास लागणारा रोल दिल्लीहून येत होता. दिल्ली येथील कारखान्यावरही चिकोडी पोलिसांनी छापे टाकले. लॅमिनेशन रोल ताब्यात घेतानाच पोलिसांना आणखी एक धक्कादायक गोष्ट सापडली.
औषधी गोळय़ांच्या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य याच कारखान्यातून मिळाले आहे. यावरून बनावट पानमसाला तयार करणारे आंतरराज्य गुन्हेगार वेगवेगळय़ा कंपन्यांची बनावट औषधेही तयार करतात, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली असून चिकोडी पोलिसांनी या प्रकरणाच्या खोलात शिरण्याचा चंग बांधला आहे. बाजारपेठेत ओरिजनलला पर्याय म्हणून त्याच नावाने अनेक डुप्लिकेट उत्पादने आली आहेत. तपास यंत्रणा किंवा मूळ कंपनीच्या ध्यानात आल्यावरच ही भानगड बाहेर पडते.
बनावट औषधी गोळय़ा तयार करण्यात पटाईत
सध्या पानमसाला व औषधी गोळय़ा तयार करणारी सिंडिकेट पोलिसांच्या जाळय़ात अडकली आहे. चिकोडी पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेले सात जण बनावट पानमसाला तयार करण्याशी निगडित आहेत. आणखी दोघे जण फरारी असून ते बनावट औषधी गोळय़ा तयार करण्यात पटाईत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. जसे बनावट पानमसाला विकण्यासाठी या सिंडिकेटचे व्यापारी जाळे आहे. तसेच बनावट औषधी गोळय़ांच्या विक्रीसाठीही जाळे आहे. या सिंडिकेटचा पर्दाफाश करणाऱया चिकोडी पोलिसांचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी कौतुक केले आहे.
सिंडिकेटची मोठी उलाढाल
पानमसाल्यावर 88 टक्के कर आकारला जातो. गुटखा तयार करण्यासाठी लागणाऱया एम गोल्ड तंबाखूवर 188 टक्के कर आहे. मूळ कंपन्या सरकारचा कर भरून आपली उत्पादने बाजारपेठेत आणतात. त्याला पर्याय म्हणून सिंडिकेट क्राईमच्या माध्यमातून बनावट उत्पादने बनवून ती बाजारपेठेत आणली जातात. या सिंडिकेटची आर्थिक उलाढालही मोठी असून देशभरातील अनेक राज्यात त्यांचे जाळे आहे. रविंद्र गोस्वामी, अजयकुमार शर्मा, सय्यद खाजी, जावेद खान, रियासत अली हे पाच जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. बनावट पानमसाला आणि गुटखा तयार करणारेच औषधी गोळय़ांचीही बनावट उत्पादने तयार करत आहेत. मानवी जीवनाशी खेळ खेळण्याचा हा धोकादायक प्रकार आहे.