दरोड्यामुळे पाटील कुटुंबीय भीतीच्या छायेत, चोरीचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान

वार्ताहर /कोगनोळी
येथील कोगनोळी-हणबरवाडी रस्त्यावरील चंद्रकांत यशवंत पाटील उर्फ सी. वाय. पाटील या निवृत्त शिक्षणाधिकाऱ्यांच्या घरात शनिवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या दरम्यान सशस्त्र दरोडा पडला. यामध्ये रोख रकमेसह 30 तोळे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. अजूनही पाटील कुटुंबीय भेदरलेल्या स्थितीत आहे. दरम्यान चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पोलीस अधिकारी व कर्मचारी दरोडा पडलेल्या घरातील व्यक्तींची व कुटुंबांची चौकशी करीत आहेत. रविवारी सकाळीही मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार अनिलकुमार कुंभार, साहाय्यक फौजदार ए. जी. तहसीलदार, हवालदार संदीप गाडीव•र यांनी मारहाण झालेल्या चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी रेखा पाटील यांच्याशी चर्चा कऊन चोरीची घटना जाणून घेतली.
दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेले सी. वाय. पाटील व त्यांची कन्या ऐश्वर्या घोरपडे यांच्यावर कागल येथील खासगी ऊग्णालयात उपचार सुरू आहेत. या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाऊन त्यांची विचारपूस केली व त्यांना धीर दिला.
भीतीपोटी मुलगीचे मंगळसूत्र तोडून चोराच्या केले स्वाधीन
दरोडेखोरांनी खोलीत एन्ट्री केली ते मारहाण करतच. घरात तीन मोठी मुले व दोन लहान बाळ असल्याने घाबरलेल्या कुटुंबाला हा मोठा धक्काच बसला आहे. काठीने मारहाण करताना बाळंतिणीने माझ्या बाळाला तरी सोडा हो, अशी आर्त हाक दिली. तरीही दरोडेखोरांनी बाळंतिणीच्या गळ्याला सुरा लावला. त्यावेळी आपण घाबऊन मुलगीचे मंगळसूत्र तोडून भीतीपोटी चोराच्या स्वाधीन केले. त्यानंतर दरोडेखोर निघून गेले असल्याचे यावेळी रेखा पाटील यांनी सांगितले.
भर वस्तीमध्ये व आसपास घरे व मुख्य रस्त्यावरच घटना घडल्याने कोगनोळी परिसरात अद्यापही भीतीचे वातावरण आहे. या चोरीचा छडा कधी लागणार याकडे कोगनोळी ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत.