नागालँडमध्ये 81.94, तर मेघालयात 74.32 टक्के मतदान
वृत्तसंस्था / कोहिमा
मेघालय आणि नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा असून 550 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य सोमवारी ईव्हीएममध्ये बंद झाले. निवडणूक आयोगाच्या ऍपनुसार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नागालँड विधानसभा निवडणुकीत 81.94 टक्के मतदान झाले, तर मेघालयात 74.32 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाची अधिकृत आणि अंतिम टक्केवारी निवडणूक आयोगाकडून मंगळवारीच जाहीर केली जाणार आहे. दोन्ही राज्यांतील निवडणुकांचे निकाल 2 मार्चला लागणार आहेत.
मेघालय आणि नागालँड या ईशान्येकडील दोन राज्यांमध्ये लोकशाहीच्या भव्य उत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली होती. सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून दोन्ही राज्यात मतदान सुरू झाले. दुपारी 1 वाजेपर्यंत मेघालयात 63.91 टक्के आणि नागालँडमध्ये 73.37 टक्के मतदान झाले होते. दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या 60 जागा असल्या तरी सध्या प्रत्येकी 59 जागांवर मतदान झाले. मेघालयचे माजी मंत्री आणि युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे (यूडीपी) उमेदवार एचडीआर लिंगडोह यांच्या निधनामुळे सोहियोंग जागेवरील मतदान पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे 60 पैकी 59 जागांवर मतदान होणार आहे. मेघालयमध्ये भाजप आणि काँग्रेसने सर्व जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. तर एनपीपी 57 जागांवर निवडणूक लढवत आहे. नागालँडमध्येही 60 पैकी 59 जागांवर मतदान झाले. राज्यातील अकुलुतो विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार काजेतो किमिनी बिनविरोध विजयी झाले आहेत.
दगडफेक, गोळीबाराच्या किरकोळ घटना
नागालँडमधील मोकोकचुंग जिह्यातील उमाबस्ती भागातील अलोगाटाकी मतदान केंद्रावर मतदानादरम्यान दगडफेक करण्यात आली. हिंसाचारामुळे मतदान काही वेळासाठी थांबवण्यात आले होते. तसेच भंडारी मतदान केंद्रावर गोळीबार झाला, ज्यात एनपीपीचा एक कार्यकर्ता जखमी झाला. तथापि, नागालँडमधील सर्व मतदान केंद्रांवर विविध सुरक्षा दलांच्या 305 कंपन्या तैनात केल्यामुळे मतदान प्रक्रियेत फारसा गोंधळ झाला नाही.